हातगाव जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांचा स्वतंत्र ई-अंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 09:33 PM2018-04-04T21:33:34+5:302018-04-04T21:33:34+5:30
विविध उपक्रम : विद्यार्थ्यांना कुस्तगिर बनविण्यासाठी धडे
अजय कोतकर
गोंडगाव ता.भडगाव : चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथील जि. प केंद्र शाळेतर्फे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ‘स्वच्छंद भरारी’ नावाचा ई-अंक सुरु केला आहे. यासोबत परिपाठातून माहितीचे संकलन तसेच मुलांमध्ये कुस्ती खेळाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांमार्फत ई-अंक तयार करणारी हातगाव जि.प.शाळा जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे.
विद्यार्थी विकासासाठी सामान्य ज्ञान स्पर्धा
शाळेत दररोज होणाऱ्या परिपाठात सांगितलेल्या विविध माहितीचे विद्यार्थी दुपारच्या सुट्टीत माहितीचे स्वतंत्र संकलन करतात. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम सामान्य ज्ञान स्पर्धेला हे विद्यार्थी सामोरे जातात. तीन वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. भविष्यात विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेत पुढे जावा हा उद्देश येथील उपक्रमशील शिक्षकांचा आहे.
वाचनात गोडी निर्माण करण्यासाठी स्वतंत्र चाचणी
दरवर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत माहितीच्या संकलनावर आधारीत १०० गुणांची ५० प्रश्न असलेली स्वतंत्र चाचणी घेतली जाते. यात शालेय पाठयक्रमातील सर्व विषयांवरील आधारीत प्रश्न व बुद्धिमत्ता प्रश्न असे परीक्षेचे स्वरूप असते. या चाचणीत पात्र ठरलेल्या विध्यार्थ्यांची तोंडी चाचणी होत असते. यासाठी शाळेतील शिक्षकांचा स्वतंत्र ग्रुप तयार करून ते कामकाज पाहत असतात अशी आगळीवेगळी चाचणी घेतल्याने विद्यार्थ्यांना वाचनात गोडी निर्माण होते. वाचन लेखन क्षमता वाढीस लागते. तसेच शालेय वाचनालयातून विद्यार्थी पुस्तके घेत असतात. विद्यार्थ्यांमध्ये जो न्यूनगंड आहे, तो न्यूनगंड कमी करून आत्मविश्वास वाढविण्याचे काम करण्याचा प्रयत्न आहे.
विद्यार्थ्यांकडून केली जाते तयारी
चाचणीमुळे यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जिद्द निर्माण होते. ही परीक्षा ऐच्छिक स्वरूपाची असते यासाठी शाळेतील सर्व विध्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली जाते. हा आगळावेगळा उपक्रम राबविण्याची संकल्पना उपक्रमशील शिक्षक रवींद्र वाघ यांची आहे. चाचणी शाळेच्या आवारातच घेतली जाते चाचणी नंतर सामूहिक उत्तर तपासणी सर्व शिक्षक करतात.
विद्यार्थ्यांना कुस्तीगीर बनण्याचे धडे
विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबर कुस्तीगीर बनण्याचे धडे देखील येथील शिक्षकांकडून देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचा शिक्षणाबरोबर क्रीडा विकास व्हावा म्हणून शिक्षक एकनाथ गोफणे यांच्या संकल्पनेतून ३ वर्षापासून कला क्रीडा सप्ताहातील कुस्तीचा सामना प्रजासत्ताकदिनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत होत असतो.
ई-अंक काढणारी जिल्ह्यातील प्रथम शाळा
जिल्ह्यातील एकमेव जि.प शाळा अशी आहे की, शाळेचा स्वत: चा स्वच्छंदी भरारी हा स्वतंत्र ई-अंक निघत असतो. या अंकात विद्यार्थ्यांनी काढलेली चित्र छापली जातात. शैक्षणिक उपक्रमांच्या माहितीचे संकलन तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे फोटो शिक्षकांना शिक्षक दिनी दिलेली निवडक शुभेच्छा पत्र छापली जातात.
पालकांच्या देणगीतून बक्षीस
यशस्वी विद्यार्थ्यांना गावातील ग्रामस्थ तसेच मान्यवरांनी दिलेल्या देणगीची रक्कम ग.स.सोसायटीत मुदत ठेव स्वरूपात ठेवली जाते. त्या रकमेच्या व्याजावर विद्यार्थ्यांना त्या रक्कमेतून बक्षीस पालकांच्या उपस्थितीत दिले जाते. विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाचे व्हीडीओ यु-ट्युबवर देखील अपलोड केले जातात.