भारत हा शरणार्थींना धर्म न विचारणारा देश - योगेंद्र यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 09:57 PM2020-02-08T21:57:35+5:302020-02-08T21:57:40+5:30
स्वामी विवेकानंदांचा विचार स्विकारल्यास नागरीकत्व सुधारणा कायद्यास विरोध नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : शरणार्थींना कधीही धर्म, जात न विचारणारा हा भारत देश आहे, हा विचार स्वामी विवेकानंद यांनी यापूर्वीच सांगितला आहे. हेच पंतप्रधानांनी सांगणे गरजेचे आहे. शरणार्थींना धर्म, जात विचारणार नाही असे पंतप्रधानांनी जाहीर करावे, असा नागरीकत्व सुधारणा कायदा भाजप आणत असेल तर आम्ही या कायद्याचे स्वागत करू असे प्रतिपादन स्वराज्य अभियानाचे नेते योगेंद्र यादव यांनी येथे केले.
८ रोजी दुपारी येथील भारतीय संविधान बचाव नागरी कृती समितीच्या वतीने खडका रोड भागातील जी.एन.जी. पार्क ग्राउंडवर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संतोष चौधरी होते. याप्रसंगी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, राष्ट्रवादीचे नेते गफ्फार मलिक, मराठा क्रांती मोर्चाचे विनोद देशमुख, संविधान जागर समितीचे मुकुंद सपकाळे, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, जळगावचे माजी उपमहापौर करिम सालार मंचावर उपस्थित होते.
भाषण देताना यादव म्हणाले की, सीएए आणि एनआरसीला विरोधासाठी आज देशभरात मोठे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन आता दुसऱ्या टप्प्यात आले आहे. सीएए कायद्यात शरणार्थी, अल्पसंख्याक, पीडित, शेजारी या चार शब्दांचा उल्लेख नाही. मात्र, भाजपा ते उघडपणे सांगायला तयार नाही. इथेच खरी गुंतागुंत आहे. तिरंगा, संविधान व देशाच्या स्वातंत्र्यावर बोलणे हा गुन्हा आहे काय? महाराष्ट्र हा कधी उत्तर प्रदेश झाला? हेच कळत नाही, असा सवाल यादव यांनी केंद्र सरकार व स्थानिक पोलीस प्रशानाला विचारला.
उमर खालीद यांना का घाबरतात?
उमर खलीद यांना का घाबरतात... त्यांची सभा भिवंडी (मुंबई) येथे झाली. त्या ठिकाणी ते संत तुकाराम यांच्यावर बोलले. तेथे अशी कोणतीच अप्रिय घटना घडली नाही. पंतप्रधान म्हणतात की, मी कपड्यांवरून माणसे ओळखतो. पण पंतप्रधानांना फक्त टोपी दिसते. तिरंगा दिसत नाही. मोदी यांच्याऐवजी जर कोणी दुसरा पंतप्रधान राहिला असता त्याला तिरंगा पाहून, भारत मातेच्या जयघोषाच्या घोषणा ऐकून गर्व झाला असता. मात्र, मोदींना त्याचा गर्व वाटत नाही, अशी टिकाही यादव यांनी केली.
फूट पाडणे हा सीएए व एनआरसी मागील उद्देश
सीएए कायद्यानुसार मुस्लिम देशातील गैरमुस्लिम लोकांना शरणार्थी होता येणार आहे. त्यात नवीन बाब काय? सीएए कायदा म्हणजे जिलेबीसारखा आहे. भारतातील नागरिकांमध्ये फूट पाडणे, हा या कायद्याचा उद्देश आहे, अशा शब्दांत यादव यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
सर्वांंनी विरोध करावा
एनआरसीसाठी जेव्हा कोणी तुमच्या घरी येईल तेव्हाच त्याला विरोध करा, अन्यथा पुढे जाऊन संकट वाढेल. महात्मा गांधीजींनी सांगितले आहे की अन्यायपूर्वक असलेल्या कायद्याला कडाडून विरोध केला पाहिजे.
घटनेला हात घालण्याचा
प्रयत्न- संतोष चौधरी
अध्यक्षिय भाषणात माजी आ. संतोष चौधरी यांनी, धर्माच्या विरुद्ध असलेल्यांविरुद्ध हे आंदोलन आहे. सरकारला हा कायदा आणण्याची गरज नव्हती. डॉ. बाबासाहेबांच्या घटनेला हात घालण्याचा प्रयत्न सरकारने केला.
यावेळी गफ्फार मलिक, करिम सलार, मकुंद सपकाळे आदींनीही मनोगत व्यक्त केले.सभेसाठी कॉंग्रेसचे संजय ब्राह्मणे, रवींद्र निकम, गटनेता उल्हास पगारे, भारिपचे विनोद सोनवणे आदी उपस्थित होते.
तगडा पोलीस बंदोबस्त
सभेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून डिवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, पोलिस निरीक्षक रामकृष्ठ कुंभार यांच्यासह १६ दुय्यम अधिकारी, दोन एसआरपी प्लाटून, चार पुरुष व एक महिला आरसीपी प्लाटून, दोन स्ट्रायकिंग फोर्स, १६५ पोलिस कर्मचारी (३१ महिला) असा तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.
सभेला महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
दुसºया स्वातंत्र्याची लढाई- प्रतिभा शिंदे
प्रतिभा शिंदे यांनी, आम्ही स्वतंत्र्य लढ्यात रक्त सांडलेल्यांचे वारसदार आहोत. शहरातील सभेला प्रशासनाने परवानगी नाकारली होती.मात्र आपण, परवाणगी द्या, अथवा नको द्या सभा होणारच असे पोलीस अधिक्षकांसमोर ठणकावून सांगितले होते. ‘एक पाव रेल में और एक पाव जेल मे’ असा आमचा नारा असल्याने आम्ही परिणामांना घाबरत नसल्याचा ईशारा त्यांनी दिला. आता देशात दुसºया स्वातंत्र्याची लढाई लढण्याची वेळ आली आहे.