भारतीय कथ्थक नृत्याचे सातासमुद्रापार ‘ऐश्वर्य’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:02 AM2019-03-08T00:02:32+5:302019-03-08T00:02:50+5:30
शेंदुर्णीची ऐश्वर्या साने करतेय कथ्थक नृत्याचा प्रचार-प्रचार
दीपक जाधव
शेंदुर्णी, ता. जामनेर - डोक्यावरील पितृछत्र हरविणे हा सर्वांसाठी मोठा धक्काच असतो. असाच धक्का बसला शेंदुर्णी येथील ऐश्वर्या चारुदत्त साने या कथक नृत्य ‘श्वास आणि ध्यास’ बनलेल्या तरुणीला. मात्र त्यातून स्वत:ला सावरत बालपणापासूनची कथ्थक नृृत्याची आवड जपत ती आता कथक विषारद झाली असून हे अस्सल भारतीय नृत्य विदेशातही पोहचविण्याचे काम करीत आहे. जर्मनीमधील कलाकारांना ‘आॅनलाईन’ पद्धतीने ती या नृत्याचे धडे देत आहे.
ताला-सुरात थिरकू लागली बाल पावले
ऐश्वर्या अवघी १० वर्षांची असताना वडील डॉ. चारुदत्त साने यांचे निधन झाले. बालपणापासूनच घरात भक्ती गीत, देशभक्तीपर गीत व लोकगीत अशा विविध प्रकारच्या संगीतावर ऐश्वर्याची पाय बालवयातच थिरकत असत. हीच आवड पुढेही तशीच राहिली आणि वाढल्याचेही तिने दाखवून दिले आहे. इयत्ता चौथीपासून कथक नृत्याचे धडे शिकायला तिने सुरुवात केली. पुणे येथील शांभवी दांडेकर या तिच्या पहिल्या गुरू. नंतर गुरू तेजस्वीनी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐश्वर्या कथक विषारद झाली. तेव्हाच तिने जर्मन भाषेतही पदवी मिळविली. तसेच मँक्सम्युलर भवन या जर्मन संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या जर्मनच्या पाच परीक्षात ती उत्तम गुणांसह उत्तीर्ण झाली.
जिव्हाळ््याच्या दोन्ही विषयांची केली निवड
जर्मन भाषेची पदवी मिळविली व विविध परीक्षाही उत्तीर्ण झाली. मात्र उच्च शिक्षणासाठी जर्मन की कथकची निवड करावी, असा मोठाच प्रश्न तिच्यासमोर उभा राहीला. कारण जर्मन भाषा आणि कथक हे दोन्ही तिच्या जिव्हाळ्याचे विषय आणि दोन्हीमध्ये ती पारंगत. मग दोन्हीना न्याय मिळावा म्हणून तिने ललित कला पुणे विद्यापीठातून एम. ए. कथक करायचा निर्णय घेतला आणि मँक्सम्युलर भवनमध्ये जर्मनच्या परीक्षाही देत राहिली. याच दरम्यान स्टडी टूरसाठी ती जर्मनीमध्ये जर्मन कुटुंबीयांसह जाऊन आली. तेव्हापासूनच तिने निश्चय केला तो जर्मनीमध्ये कथकचा प्रसार करायचा.
विद्यार्थी दशेतच विविध पुरस्कारांची धनी
सध्या एम.ए.च्या शेवटच्या वर्षात असताना ती अनेक पारितोषिकांची विजेती आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, दिल्ली यासह विविध शहरातून तसेच ओडिशा राज्यातील विविध स्पर्धा, महोत्सवात ती सहभागी झाली आहे. पारंपारिक रचनांबरोबर अनेक फ्यूजनवरही बहारदार नृत्य हे वैशिष्ठ जपत प्रत्येकवेळी दर्शकांची उत्स्फूर्त दाद तिने मिळवली आहे. २०१७मध्ये अतिशय मानाचा समजला जाणारा ‘विष्णू दिगंबर पलुस्कर पुरस्कार’ तिला मिळाला आहे.
कथकचा प्रचार-प्रचार
ऐश्वर्या ही २०१३पासून कथक नृत्याचे प्रशिक्षण वर्गही घेत असून या अस्सल भारतीय नृत्याचा प्रचार-प्रचार करण्यासाठीही ती प्रयत्न करीत आहे. पुणे कोथरुड व कल्याणी नगर येथे कथक नृत्याच्याशी संबंधित संस्थेमार्फत ती अनेक विद्यार्थ्यांना कथक शिकवते. तसेच जर्मनीतल्या विद्याथीर्नींना आॅनलाईन कथक शिकविण्याचे काम तिने सुरू ठेवले आहे. या माध्यमातून आपले भारतीय नृत्य जगभरात पोहचणार व बहरणार असल्याचा विश्वासही तिने व्यक्त केला आहे.
कला प्रिय ऐश्वर्याचा ‘कला’कडेच कल
इयत्ता दहावीमध्ये ९२ टक्के गुण मिळून उत्तीर्ण झाल्यावरही ऐश्वर्याने कला शाखेची निवड केली. तसा तिने आग्रहही धरला आणि तिचा श्वास आणि ध्यास असलेल्या कथकमध्ये ती तिच्या गुरूंच्या आशीर्वादाने व अथक परिश्रमाने मार्गक्रमण करीत आहे. घरात आजोबांनंतर वडिलांचे वैद्यकीय सेवेतील काम पाहता व इयत्ता दहावीत गुण पाहता मुलगी सुद्धा विज्ञान शाखेकडे वळून भविष्यात वैद्यकीय शिक्षण घेईल असे सर्वांनाच वाटत होते. परंतु अंगातील उपजत कलांना वाव देत संस्कृती, परंपरेचा वारसा जोपासत आपले ध्येय साध्य करण्याच्या दिशेने ऐश्वर्याची वाटचाल देशातच नव्हे तर सातासमुद्रापार जर्मनी, नेदरलँड, पॅरिस अशा देशांमध्ये पोहचून भारतीय परंपरेचे ऐश्वर्य टिकविण्याचे काम ऐश्वर्या करीत आहे.