indpendece day गांधीजींच्या आंदोलनातून स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 01:27 AM2018-08-15T01:27:09+5:302018-08-15T01:27:42+5:30
एकनाथ माळी : ध्वजारोहणाचा आनंद मोठा
मोहन सारस्वत
जामनेर, जि.जळगाव : गावातील हॉटेलवर २५ पैसे रोजंदारीने काम करुन सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा १६ वर्षांचा होतो. पारतंत्र्य कसे असते ते जवळून पाहिले, हालअपेष्टा सहन केल्या, असे जामनेर येथील स्वातंत्र्य सेनानी एकनाथ सखाराम माळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
माळी यांचा जन्म ८ जानेवारी १९३१ चा. लहानपणापासूनच त्यांना देशप्रेमाचे वेड. महात्मा गांधींच्या आंदोलनापासून प्रेरणा मिळाल्याचे ते सांगतात. १९५५ मध्ये गोवा मुक्ती संग्रामात त्यांच्यासोबत राजाराम बावस्कर व जयराम मोरे होते. गांधींच्या हत्येनंतर त्यांना चार महिन्यांचा कारावास धुळे येथे भोगावा लागला.
लहान असताना वामन दुधमांडे, हरिभाऊ बारी, पांडुरंग सोनवणे यांचे सोबत जामनेर रेल्वेस्थानकावरील सिग्नल फोडले. रेल्वेस्थानकाची देखभाल करणाऱ्या मुकदमाने पाठलाग केला. पळत जाऊन एका शेतात लपलो. मजुरांसोबत काम केल्याने सापडलो नाही, अशी आठवण त्यांनी सांगितली. गोवा मुक्ती संग्रामात केलेल्या आंदोलनानंतर खिशात पैसे नसल्याने विनातिकीट पुण्यापर्यंत रेल्वेने आलो. मात्र स्वकियांकडूनच दंड वसूल केला गेला, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. दोन वर्षांपूर्वी माळी यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कार्याची दखल घेत राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. पहिल्या ध्वजारोहणाचा उत्साहदेखील अतिशय मोठा होता.