सहा महिन्याखालील सहा बालके बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:15 AM2021-04-17T04:15:36+5:302021-04-17T04:15:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविडची बाधा झालेल्या एका पाच दिवशीय बालकाचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र, हे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविडची बाधा झालेल्या एका पाच दिवशीय बालकाचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र, हे बालक कमी दिवसांचे असल्याने गंभीर होते, असेही समोर येत आहे. दुसरीकडे बालक बाधित होण्याचे शिवाय त्यातही गंभीर होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सहा पैकी चार बालके हे गंभीरावस्थेत गेली होती. मात्र, त्यांना वाचविण्यात यंत्रणेला यश आले आहे.
गेल्या महिनाभरापूर्वी एका दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. मात्र, या बालकाला गंभीरावस्थेत दाखल करण्यात आले होते. त्याला वाचविण्यासाठी पुरेसा वेळ डॉक्टरांना मिळाला नव्हता, तरीही डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. आता एका पाच दिवसांच्या बाळाचा मृत्यू होण्याची पहिलीच घटना जळगावात समोर आली आहे. अशा परिस्थितीत गर्भवती मातांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे डॉक्टर सांगतात.
मातेला प्राधान्य
कोविडमध्ये माता गंभीर असेल तर उपचारांसाठी मातेच्या जीवाला प्राधान्य देऊन तातडीने सिझर करावे लागते, असेही डॉक्टर सांगतात. आणिबाणीच्या स्थितीत असे करावे लागते, अशाच स्थितीत या मातेच्या पोटात पाणी झाल्यामुळे कमी दिवसात सिझर करण्यात आले हाेते.
बालकांबाबत पालकांनी दुर्लक्ष करू नये, दुसऱ्या लाटेत बालकेही बाधित व गंभीर होत आहे.त्यामुळे लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी, पुढील धोके टाळता येतात. - बाळासाहेब सुरोसे, बालरोगतज्ञ, जीएमसी