जेएन-१चा संसर्ग जीवघेणा नाहीच; इम्युनिटी वाढवा, कोरोनामुक्त राहा: डॉ. जसवंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2023 05:34 AM2023-12-26T05:34:57+5:302023-12-26T05:36:47+5:30

देशातील तीन रुग्णांचे मृत्यू अन्य गंभीर आजाराने, भीतीमुक्त राहा; गर्दीच्या ठिकाणी सतर्कता बाळगा.

infection with jn 1 is not life threatening increase Immunity stay corona free | जेएन-१चा संसर्ग जीवघेणा नाहीच; इम्युनिटी वाढवा, कोरोनामुक्त राहा: डॉ. जसवंत पाटील

जेएन-१चा संसर्ग जीवघेणा नाहीच; इम्युनिटी वाढवा, कोरोनामुक्त राहा: डॉ. जसवंत पाटील

कुंदन पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव ( Marathi News ): ‘ओमिक्रॉन’च्या नवीन सब-व्हेरियंट जेएन-१चा संसर्ग जीवघेणा मुळीच नाही. उपद्रवीही नाही. त्यामुळे भीतीमुक्त राहून आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर दिल्यास कोरोनातून सहज मुक्ती मिळते. त्यासाठी रुग्णालयात दाखल होण्याची गरज नसल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथीचे (सीसीआरएच) व आयुष टास्क फोर्सचे सदस्य डॉ. जसवंत पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.

खोकल्याची काळजी घ्या

खोकला जात नसल्यास आणि जीव घाबरायला लागल्यास ऑक्सिजनची पातळी मोजत राहावी आणि छातीचा एक्स-रे काढून उपचार घ्यावा. त्यासाठी रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही.

वेगाने पसरणारा विषाणू 

जेएन-१ व्हेरियंट अतिशय वेगाने पसरणारा विषाणू आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि खोकलाग्रस्तांपासून दूर राहणे, हा उत्तम पर्याय आहे. कोविडवर काम करणाऱ्या राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार समूहाचे (एनटीएजीआय) अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांच्या मते, अतिरिक्त लसीकरणाची गरज नाही. त्यामुळे भीतीमुक्त जगून सहजच या विषाणूशी लढावे, असा सल्ला डॉ. पाटील यांनी दिला आहे. 

तिघांचा मृत्यू कोरोनामुळे नव्हे  

देशात नव्या व्हेरियंटचे ५ हजारांवर रुग्ण आहेत. त्यात तिघांचा मृत्यू झाला. मात्र, या तिघांचा कॅन्सरसारख्या आजाराने झाला; कोरोनामुळे नव्हे. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करा, असे डॉ. पाटील म्हणाले.

जगाला वेढा बसू लागला 

वर्षाअखेरीस ‘ओमिक्रॉन’च्या नवीन सब-व्हेरियंट जेएन-१ च्या माध्यमातून पुन्हा एकदा कोरोनाने जगाला वेढा घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. 

कोण आहेत डॉ. जसवंत पाटील? 

एमबीबीएस, एम.डी. शिक्षित डॉ. जसवंत पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील. अनेक वर्षे केईएम हॉस्पिटलमध्ये ते सेवारत होते. २० वर्षांच्या चिकित्सेनंतर त्यांनी बीएचएमएस पदवी संपादन केली आणि होमिओपॅथीच्या संशोधनात सक्रिय झाले. 

‘जेएन-१’ची बाधा झाल्यास घाबरू नका. छातीत मोठ्या प्रमाणावर कफ झाल्यास एक्स-रेच्या माध्यमातून निदान करूनच उपचार घ्यावेत. - डॉ. जसवंत पाटील, सदस्य, सीसीआरएच

 

Web Title: infection with jn 1 is not life threatening increase Immunity stay corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.