मुक्ताईनगर कोविड सेंटरमध्ये रुग्णांना निकृष्ट जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 12:33 AM2020-08-25T00:33:30+5:302020-08-25T00:34:45+5:30
कोविड सेंटरमध्ये रुग्णांना निकृष्ट व अळ्या असलेले जेवण मिळत असल्याची तक्रार जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
मुक्ताईनगर : येथील गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालयात शासनाच्या वतीने कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना निकृष्ट व अळ्या असलेले जेवण मिळत असल्याची तक्रार जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात येणारे जेवण हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, जेवणात किडे, अळ्या आढळून आल्या आहेत. असे निकृष्ट जेवण दिले तर रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. ही माहिती मिळाली. यावर अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर या स्वत: तहसीलदार श्याम वाडकर, पं.स. सभापती विद्या पाटील, पं.स.सदस्य विकास पाटील, राजेंद्र सवळे, माजी सभापती राजू माळी, युवा मोर्चाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख दत्ता पाटील, तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, ललित महाजन, संजय तितूर, शिवराज पाटील, सुनील काटे, नीलेश मालवेकर, पीयूष महाजन, यांच्यासमवेत कोविड सेंटरला दाखल झाल्या. त्यांनी संबंधित ठेकेदाराची कानउघाडणी केली. तरीही ठेकेदाराचा माणूस हा अरेरावीची भाषा करत असल्याने अॅड.रोहिणी खडसे यांनी तत्काळ जिल्हाधिकाºयांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधत संबंधित ठेकेदाराची तक्रार केली. एवढेच नव्हे तर उत्कृष्ट जेवण न मिळाल्यास आंदोलनाचा इशारादेखील दिला.
याप्रसंगी रुग्णांनी वेळेवर औषधोपचार, प्यायला शुद्ध पाणी, पाणी तसेच आंघोळीला गरम पाणीदेखील मिळत नसल्याची खडसेंकडे तक्रार केली.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनीदेखील सेंटरला प्रत्यक्ष भेट देत रुग्णांची व्यथा जाणून घेतली.