जात पंचायतीच्या विळख्यात फासेपारध्यांची घुसमट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:20 AM2021-07-07T04:20:17+5:302021-07-07T04:20:17+5:30
रवींद्र हिरोळे मुक्ताईनगर जि. जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील तीन गावांमधील आदिवासी जात पंचायतीच्या विळख्यात सापडले आहेत. फासेपारधी समाजातील ...
रवींद्र हिरोळे
मुक्ताईनगर जि. जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील तीन गावांमधील आदिवासी जात पंचायतीच्या विळख्यात सापडले आहेत. फासेपारधी समाजातील काही अपप्रवृत्तीची माणसे जात पंचायतीच्या नावाखाली मुखिया बनून फासेपारध्यांचे शोषण करत आहेत. या प्रकाराला कंटाळलेल्या या लोकांनी थेट राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करीत जाचातून सुटका करण्याची हाक दिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला व सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या लालगोटा, हलखेडा आणि मदापुरी ही फासेपारधी बहुल आदिवासी गावे. परंपरागत रुढी आणि मान्यतांना वर्षानुवर्षे जपत फासेपारध्यांनी आपले वेगळेपण जपले आहे. मात्र यातील काही अनिष्ट रुढी फासेपारध्यांचे आर्थिक, सामाजिक, मानसिक व शारीरिक शोषण करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार समाजातील लोकांमध्ये जाणीवपूर्वक वाद निर्माण करायचा. त्यांची जात पंचायत बसवायची आणि त्यांच्याकडूनच लाखो रुपये दंड वसूल करायचा. दंड भरला नाही तर त्यांना गावातून हाकलून लावायचे आणि त्यांच्या जमिनीवर कब्जा करायचा.
दादागिरीने त्यांच्या मुलींची परप्रांतीय लोकांना विक्री करायची, या मोबदल्यात लाखो रुपये कमावायचे, महिला- मुलींना शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बळजबरी करायची, असे प्रकार हे तथाकथित मुखिया मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत. अशा आशयाची तक्रार ग्रामस्थांनी राज्य मानवाधिकार आयोगाकडे केली आहे.
चौकट
यांच्या विरोधात तक्रार
सिगरेटबाबू ऊर्फ ठगडी कोनानी पवार, युवराज जिल्लाल भोसले, शिलोन कालूसिंग भोसले, दर्शनलाल राजमल पवार, शम्मी जिल्लाल भोसले, टोनी
दर्शनलाल पवार या मुखियांविरुद्ध ग्रामस्थांनी राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे.
चौकट
यांचा सुरू आहे लढा
या तथाकथित जात पंचायती विरोधात लालगोटा, हलखेडा, मदापुरी येथील अक्काबाई जोगिंदर भोसले, जोगिंदर राजवंती भोसले, बल्लू गलोबा भोसले, भगवान भोसले, विशाल पवार, केनसिंग भोसले, सोद्यासिंग पवार, मोंटूस पवार, शरबतलाल पवार, उर्मिला पवार, टिंकू भोसले, राजमिना पवार, नीलम पवार, कृष्णा पवार, कालीबाई पवार, चट्टाणसिंग पवार, रमेश पवार, हबाब पवार, केवळदास पवार, जीनाबाई भोसले यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी लढा सुरू केला आहे. सन २०१३ पासून पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे जातपंचायत विरोधात अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. आताही शेकडो लोकांनी राज्य मानवी हक्क आयोग कडे स्वाक्षऱ्या आणि अंगठे देऊन तक्रार दिली असून या जाचक परंपरेतून सुटका करण्याची याचना केली आहे.