खाद्यतेलाला पुन्हा महागाईची फोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:14 AM2021-04-19T04:14:14+5:302021-04-19T04:14:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवड्यातील भाववाढीनंतर या आठवड्यातदेखील खाद्यतेलाच्या भावात पुन्हा वाढ झाली असून सोयाबीन तेल थेट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या आठवड्यातील भाववाढीनंतर या आठवड्यातदेखील खाद्यतेलाच्या भावात पुन्हा वाढ झाली असून सोयाबीन तेल थेट १५० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. याशिवाय डाळींचे भाव वाढल्याने बेसनपीठदेखील वधारले आहे. भाजीपाल्याचे भाव मात्र गेल्या आठवड्यात प्रमाणे स्थिर आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून खाद्यतेलाच्या भावात चढ-उतार होत असलेल्या खाद्य तेलामध्ये सलग दोन आठवड्यांपासून भाववाढ सुरू आहे. यात गेल्या आठवड्यात सोयाबीन तेलात भाववाढ होऊन ते १४० ते १४५ रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. त्यानंतर याही आठवड्यात ही भाववाढ कायम राहत तेलाचे भाव १५० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. शेंगदाण्याच्या तेलातही भाववाढ होऊन ते पुन्हा १८० ते १९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे. तसेच सूर्यफूल तेलाच्याही भावात वाढ होऊन ते १७५ ते १८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. खाद्य तेलातील सततच्या भाववाढीने ग्राहक चांगलेच चिंतित झाले आहे.
साखर अजूनही स्थिर
या आठवड्यात डाळींचे भावदेखील वाढले असून यात हरभरा डाळीच्या भाववाढीने बेसनपीठदेखील वधारून ते ८० ते ९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे. साखर ३६ रुपये प्रतिकिलोवर स्थिर असून रवा ३५ ते ४० रुपये तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे. याशिवाय इतर किराणा मालाचे भाव स्थिर आहे.
पालेभाज्यांचे भाव स्थिर
सध्या उन्हाळा सुरू झाला असला तरी भाजीपाल्याचे भाव गेल्या आठवड्याप्रमाणे स्थिर आहे. कोथिंबीर ४० रुपये किलो तर मेथीही ४५ रुपये किलोवर आहे.
कांदे नियंत्रणात
गेल्या काही दिवसांपासून बटाट्याचे भाव कमी होऊन ते २० रुपये प्रति किलोवर आहेत. यासोबतच कांद्याचे भावदेखील कमी होऊन ते २० रुपये प्रतिकिलोवर आले आहे. टमाटे ३५ ते ४० रुपये प्रतिकिलोवर असून त्यांची आवक चांगली आहे.
खाद्यतेलाचे भाव पुन्हा वाढल्याने दर आठवड्याला आर्थिक भार वाढतच आहे. इतर किराणा मालाचे भाव स्थिर असल्याने दिलासा आहे.
- सुरेश शिरसाठ, ग्राहक
खाद्यतेलाच्या भावात या आठवड्यात पुन्हा वाढ झाली आहे. सोबतच डाळीदेखील महागल्या असून इतर किराणा माल स्थिर आहे.
- सचिन छाजेड, व्यापारी
सध्या भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने या आठवड्यात त्यांचे भाव स्थिर आहे.
- गोपाल वाणी, भाजीपाला विक्रेते