घरगुती लोणच्याला यंदा महागाईचा तडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:12 AM2021-06-06T04:12:42+5:302021-06-06T04:12:42+5:30
विजयकुमार सैतवाल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दोन्ही वेळच्या जेवणासाठी घरोघरी ताटात असणाऱ्या लोणचे तयार करण्याचा हंगाम सुरू झाला ...
विजयकुमार सैतवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दोन्ही वेळच्या जेवणासाठी घरोघरी ताटात असणाऱ्या लोणचे तयार करण्याचा हंगाम सुरू झाला असला तरी यंदा घरगुती लोणच्यासाठीच्या सर्वच घटक पदार्थांचे भाव चांगलेच वाढल्याने लोणचे टाकण्याच्या प्रमाणात काटकसर केली जात आहे. लोणच्याच्या कै-यांची आवक वाढण्याची प्रतीक्षा असून यंदा खाद्यतेलासह लोणच्यासाठीच्या सर्वच घटक पदार्थांचे भाव दीड पटीहून अधिक वाढले आहे.
कै-यांची आवक अद्याप कमीच
जळगाव शहरात शनिवारी मोठ्या प्रमाणात की खरेदी असते. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधामुळे आठवडे बाजार बंद असून कैरी विक्रेते वेगवेळ्या ठिकाणी बसून विक्री करीत आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात अजूनही कैरीची आवक यंदा सुरू झालेले नाही. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज ४० ते ४५ क्विंटल कैऱ्यांची आवक होत आहे. दरवर्षी या दिवसात ही आवक ६० क्विंटलपर्यंत असते. मात्र यंदा निर्बंधांमुळे कैरीच्या आवकवर देखील परिणाम झाला आहे.
''राजापुरी''ची प्रतीक्षा
जळगाव जिल्ह्यामध्ये राजापुरी, तोतापुरी, गावराणी या कैऱ्यांची आवक होत असते. यात सध्या आंध्र प्रदेशातील तोतापुरी कैरीची तसेच नाशिक जिल्ह्यासह सिल्लोड व परिसरातून गावराणी कैऱ्यांची आवक सुरू आहे. मात्र गावरानी कैरीची पाहिजे त्या प्रमाणात उपलब्धता नसल्याने जळगावात राजापुरी कैरीला लोणच्यासाठी पसंती दिली जाते. यंदा अद्याप राजापुरी कैरीची आवक सुरू झालेले नसून गुजरात मधून येणाऱ्या या कैरीची जळगावकरांना प्रतीक्षा आहे. बाजार समितीमध्ये सध्या लोणच्याच्या कैऱ्या १० ते २५ रुपये प्रति किलोने विक्री होत असून किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये प्रति किलोपर्यंत कैरीचे भाव आहे.
तेल बिघडवतेय गणित
दररोज खाद्यपदार्थातील महत्त्वाचा घटक असलेल्या खाद्यतेलाचे भाव गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. यात जास्त वापर असलेल्या सोयाबीन तेलाचे भाव वाढण्याससह शेंगदाणा, सूर्यफूल, तीळ या सर्वच प्रकारच्या तेलाचे भाव वाढले आहे. लोणच्यासाठी शेंगदाणा तेलाचा अधिक वापर केला जातो. त्यात सध्या शेंगदाणा तेल १९० ते १९५ रुपये प्रति किलोवर पोहोचले असून गृहिणींचे चांगलेच बजेट कोलमडले आहे.
मसाला दीडपटीने महागला
लोणच्यामध्ये मसाल्यातील विविध पदार्थांचा वापर करून लोणच्याचा चविष्ट मसाला तयार केला जातो. यामध्ये बहुतांश घटक पदार्थांचे भाव दीडपट ते दुप्पटीने वाढले आहे. यामुळे देखील लोणचे तयार करणे चांगलेच महागात पडत आहे.
लोणच्याचा घटक पदार्थांचे यंदाचे व गेल्या वर्षाचे तुलनात्मक भाव
पदार्थ -गेल्या वर्षाचे भाव- यंदाचे भाव (प्रति किलो)
कैरी -३५-५०
शेंगदाणा तेल - १३०-१९५
मोहरी डाळ -१००-१४०
बडिशोप -२४०-३१०
लवंग-८००-९००
काळे मिरी- ११५०-११५०
दालचिनी -६००-६४०
बाजा -११००-२१००
तेजपान -१८०-१८०
मेथी -९०-११०
गावरानी धने - ११०-१००
इंदुरी धने-१६०-१५०
कपुरचीनी -२०००-१८००
विलायची दाना-१६००-१६००
हिंग-१८०-१८०(प्रति तोळा)
---------------------
लोणच्यासाठी लागणाऱ्या मसाल्यातील घटक पदार्थांची मागणी सध्या चांगली वाढली आहे. मात्र बहुतांश पदार्थांचे भाव यंदा वाढले आहे. काहींच्या आवकवर परिणाम असल्याने तर काही पदार्थांच्या पिकावर परिणाम झाल्याने भाववाढ झालेली आहे.
- सुरेश बरडिया, मसाले व सुकामेवा विक्रेते
सध्या तोतापुरी, गावरानी कैरीची आवक सुरू आहे. मात्र राजापुरी कैरीची आवक अद्याप सुरू झालेली नाही.
- वासू पाटील, भाजीपाला विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती
सध्या उपलब्ध असलेल्या कै-यांची विक्री केली जात आहे. आपल्याकडे राजापुरी कैरीच्या लोणच्याला अधिक पसंती असते. मात्र तिची आवक सध्या सुरू झालेली नाही. यंदा कैरीचे भाव देखील वाढले आहे.
- भीमा पारधे, कैरी विक्रेता.
सध्या लोणचे तयार करण्याचा हंगाम सुरू असला तरी यंदा कमी प्रमाणात लोणचे केले जात आहे. तेलासह मसाल्याचे ही भाव वाढल्याने बजेट कोलमडत आहे. त्यामुळे ही काटकसर करावी लागत आहे.
- सीमा महाजन, गृहिणी