महागाईत भाजीपाल्याची स्वस्ताई, जळगावात गृहिणींना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:11 PM2018-09-22T12:11:23+5:302018-09-22T12:12:12+5:30
टमाटे १० रुपये प्रती किलो
जळगाव : सध्या सर्व भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने बटाटे वगळता सर्वच भाज्यांचे भाव कमी झाले आहे. टमाटे तर १० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे. इंधन दरवाढीने सर्वसामांन्याचे कंबरडे मोडले आहे, त्यात भाजीपाला स्वस्त झाल्याने सर्वसामान्यांना व गृहिणींना दिलासा मिळाला आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातील विविध भागासह मराठवाड्यातून भाजीपाल्याची आवक होत असते. त्यात सध्या पावसाने उघडीप दिल्याने भाजीपाला सहज काढता येत आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात हरतालिका, गणेशोत्सव यामुळे शेतकºयांनी शेतातून माल न काढल्याने आवक कमी झाली होती. त्यामुळे गंगाफळ, गवारच्या शेंगा, कोथिंबीर, मेथीची भाजी यांची आवक घटून त्यांचे भाव वाढत गेले. सध्या गणेशोत्सवात भंडाºयासाठी गंगाफळ व इतर भाज्यांना मागणी वाढली असली तरी आवकही वाढल्याने गंगाफळ व इतर भाज्याचे भाव स्थिर आहे.
बटाट्याची आवक या आठवड्यात चांगली असल्याने त्यांच्या भावात घसरण होण्याची अपेक्षा होती. मात्र बटाटे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १३०० ते १५०० रुपये प्रती क्विंटलवर व किरकोळ बाजारात ते १५ ते २० रुपये प्रति किलोवर स्थिर आहे. गेल्या आठवड्यात बाजार समितीमध्ये १५०० ते २५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या वांग्याचे भाव १००० ते २००० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. किरकोळ बाजारातही वांग्याचे भाव २० ते २५ रुपये किलोवर आले आहेत. अशाच प्रकारे टमाट्याचेही भाव २०० रुपये प्रती क्विंटलने कमी झाले असून ते ३०० ते ५०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. किरोकळ बाजारात १० रुपये प्रती किलोने टमाट्याची विक्री होत आहे.
असे आहेत भाजीपाल्याचे दर
भेंडी २० ते २५ रुपये प्रती किलो, गंगाफळ १५ रुपये, फुलकोबी १५ ते २० रुपये, खिरे १० ते १५ रुपये, कारले २० ते २५ रुपये, कोथिंबीर २० ते २५ रुपये, मेथी २० ते २५ रुपये, पालक २० रुपये, हिरवी मिरची १० ते १५ रुपये प्रती किलो, वांगे पोकळा २० रुपये प्रती किलो अशा दराने भाज्यांची विक्री होत आहे.
ठिकठिकाणी लागतात ढीग
सध्या आवक वाढल्याने शहरातील अनेक भागात हिरवी मिरची, कोथिंबीर, भेंडी, मेथीची भाजी यांची हातगाडी तसेच मालवाहू रिक्षांध्ये ढीगचे ढीग आणून त्यांची विक्री होत आहे. अनेक ठिकाणी कोथिंबीरचे मोठी जुडी ५ रुपयांनी विक्री होत आहे.