महागाईचा चटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 06:14 PM2020-01-05T18:14:28+5:302020-01-05T18:14:53+5:30

विश्लेषण

Inflationary burden | महागाईचा चटका

महागाईचा चटका

Next

विजयकुमार सैतवाल
जळगाव : नववर्षाच्या सुरुवातीलाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने सामान्यांचे गणित बिघडत असून महागाई आणखी कोणत्या उंचीवर जाईल, यांची चिंता सर्वांनाच लागली आहे. दैनंदिन वापरातील खाद्य तेल, गॅस सिलिंडर, बटाट्याच्या किंमती भरमसाठ वाढून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना महागाईचा चटका बसला आहे. शेंगदाणा तेलाची निर्यात सुरू झाल्याने ते २० रुपये प्रती किलो तर अतिपावसामुळे नुकसान झाल्याने सोयाबीन, सूर्यफूल, पाम तेलही सहा ते आठ रुपये प्रती किलोने कडाडले आहे. या सोबतच घरगुती गॅस सिलिंडर १९ रुपयांनी महागले आहे तर बटाटे ३० ते ३५ रुपये प्रती किलोवर पोहचले आहेत.
दररोज प्रत्येक घर तसेच खाद्य पदार्थांच्या व्यवसायातील अविभाज्य घटक असलेल्या खाद्य तेल तसेच गॅस सिलिंडर यांचे भाव वाढल्यास त्याचा मोठा परिणाम होत असतो. गेल्या पाच महिन्यांपासून सातत्याने गॅस सिलिंडरचे भाव वाढत आहे तर या पूर्वी आयात शुल्क वाढल्याने पाम तेल व सोयाबीन तेलाचे भाव वाढले होते. आता अतिपावसामुळे सोयाबीन तेलाचे तर स्थिर असलेल्या शेंगदाणा तेलाची निर्यात सुरू झाल्याने त्याचेही भाव वाढले आहे.
अमेरिकन डॉलरचे दर सातत्याने वाढत आहे. त्याचा परिणाम इंधन व सोने या भारतीय बाजारपेठेतील या दोन महत्त्वाच्या घटकांसह आता खाद्य तेलावरही होत असल्याचे चित्र आहे. डॉलरचे दर ७१.३८ रुपयांवर पोहचले आहेत. डॉलरच्या या वाढत्या दरामुळे मलेशिलायमधून आयात होणाऱ्या पामतेलाच्या भाववाढीस मदत होत आहे. दोन महिन्यांपूर्वी ७५ रुपये प्रती किलो असलेले पामतेलाचे भाव डॉलरचे दर वाढल्याने गेल्या महिन्यात ८८ रुपये प्रतिकिलोवर पोहचले होते. त्यानंतर हळूहळू भाव वाढत जाऊन १०० रुपयांवर पोहचले. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्यात आणखी ६ रुपये प्रती किलोने वाढ होऊन ते १०६ रुपयांवर पोहचले आहेत.
एरव्ही पाम तेलाचे भाव इतर तेलाच्या तुलनेत कमीच असतात. या तेलावर पूर्वी आयात शुल्क १५ टक्के होते. त्यात गेल्या वर्षी थेट दुप्पट वाढ करून ते ३० टक्के करण्यात आले. त्यामुळे पाम तेलाचे भाव वधारले होते. पाम तेलाचे भाव वाढल्याने सर्वाधिक वापर असलेल्या सोयाबीन तेलाच्याही भाववाढीस मदत मिळत आहे. दोन महिन्यांपूर्वी ८७ रुपये प्रती किलो असलेल्या सोयाबीन तेलाचे भाव गेल्या महिन्यात ९७ रुपये प्रती किलोवर पोहचले. आता यात भर म्हणजे अतिपावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने या तेलाचे भाव पुन्हा ८ रुपये प्रती किलोने वाढून ते १०५ रुपये रुपये प्रती किलोवर पोहचले आहे.
गेल्या आठवड्यापर्यंत पाम व सोयाबीन तेलाचे भाव वाढत गेले तरी स्थिर होते. इतकेच नव्हे तर दोन महिन्याच्या तुलनेत गेल्या महिन्यात शेंगदाणा तेलाचे भाव १४० रुपये प्रती किलोवरून १३० रुपये प्रती किलोवर आले होते. आता मात्र शेंगदाणा तेलाची चीनमध्ये निर्यात होऊ लागल्याने या तेलाचे भाव थेट २० रुपये प्रती किलोने वधारून ते १५० रुपये प्रती किलो झाले आहे.
६ ते २० रुपये प्रति किलोने खाद्य तेलाच्या दरात वाढ झाल्याने याचा मोठा परिणाम सामान्यांसह व्यापाऱ्यांच्याही गणितावर होत आहे. दररोज टनाने तेलाची खरेदी होत असलेल्या व्यापाºयांसाठी प्रती किलो ६ ते २० रुपये वाढ गणित बिघडविणारी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किंमती गेल्या पाच महिन्यांपासून सतत वाढत असून आतादेखील घरगुती सिलिंडरच्या किंमतीत १९ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता जळगावकरांना एका घरगुतीसाठी सिलिंडरसाठी ७१४.५० रुपये मोजावे लागणार आहे. सिलिंडरच्या किंमतीत पाच महिन्यात तब्बल १३७.५० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्याची दरवाढ होण्यापूर्वी जळगावात घरगुती सिलिंडरची (१४ किलो) किंमत ६९५.५० रुपये होती. त्यात जानेवारी महिन्यात १९ रुपयांची वाढ होऊन सिलिंडरची किंमत आता ७१४.५० रुपयांवर पोहचली आहे.
कांद्यापाठोपाठ आता बटाट्याचेही भाव वाढले आहेत. जळगावच्या बाजारपेठेत इंदूर येथून बटाटा येतो. पूर्वी ५०० ते ६०० क्विंटल असलेली आवक घटून ती ३०० क्विंटलवर आली आहे. त्यामुळे बटाट्याचे भाव वाढून ते ३० ते ३५ रुपये प्रती किलोवर पोहचले आहे.
या सर्व भाववाढीमुळे नवीन वर्षाच्याच सुरुवातीला महागाईचे चटके सुरू झाले आहे.

Web Title: Inflationary burden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव