‘महाजनादेश’वर महाजनांचा प्रभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 02:26 PM2019-08-19T14:26:35+5:302019-08-19T14:29:07+5:30
जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा २२ रोजी जिल्ह्यात येत आहे. त्यांच्या तीन ठिकाणी जाहीर सभा होत ...
जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा २२ रोजी जिल्ह्यात येत आहे. त्यांच्या तीन ठिकाणी जाहीर सभा होत आहे. या ‘महाजनादेश’ यात्रेवर गिरीश महाजन यांचा प्रभाव असल्याचे दिसून येत आहे.
धुळ्याहून २२ रोजी सकाळी ११.३० वाजता अमळनेरमार्गे या यात्रेचा जिल्ह्यात प्रवेश होईल. अमळनेर येथे सकाळी ११.३० तर धरणगाव येथे दुपारी १२.३० वाजता स्वागत होईल. त्यानंतर जळगाव येथे दुपारी १.३० वाजता सागरपार्क मैदानावर सभा होणार आहे. तर जामनेरला दुपारी ३ वाजता व भुसावळला ५ वाजता जाहीर सभा होईल. तसेच भुसावळ येथे मुक्काम होईल. २३ रोजी किन्ही, बोदवड, एनगावमार्गे ही महाजनादेश यात्रा मलकापूरकडे रवाना होणार आहे.
जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जळगाव येथे मुख्यमंत्र्यांची सभा होईल. त्यानंतर जामनेर येथे मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात जामनेर येथे सभा होईल. तर जिल्ह्यातील तिसरी व शेवटची सभा भुसावळला होईल. सध्या जरी भुसावळला भाजपाचा आमदार असला तरीही युतीच्या जागा वाटपानुसार भुसावळची जागा सेनेकडे आहे. असे असताना तेथे आमदार खडसे यांच्या मतदारसंघात सभा घेणे सोयीस्कर टाळल्याची चर्चा आहे. केवळ किन्हीमार्गे बोदवडहून जाताना रस्त्यात या यात्रेचे स्वागत केले जाणार आहे.
‘महाजनादेश’वर महाजनांचा प्रभाव
या ‘महाजनादेश’ यात्रेच्या जिल्ह्यातील मार्गावर जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांचा प्रभाव असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच जळगावहून यात्रा वाकडा रस्ता करून जामनेरला जाणार मात्र भुसावळहून मुक्ताईनगरला न जाता बोदवडमार्गे थेट मलकापूरला निघून जाणार आहे. एकंदरीतच खडसेंचे महत्व कमी करण्याचा सोयीस्कर प्रयत्न या यात्रेच्या मार्गाच्या नियोजनावरूनही केला गेल्याचे बोलले जात आहे.
सेनेकडे असलेल्या मतदार संघात सभा
जिल्ह्यात ३ सभा होणार असून त्यापैकी दोन सभा जळगाव शहर व भुसावळ या युतीच्या जागा वाटपात सेनेकडे असलेल्या मात्र मागील वेळी सेना-भाजप स्वतंत्र लढल्याने भाजपने जिंकलेल्या मतदार संघात होणार आहेत. त्यातच भाजपचे विद्यमान आमदार असलेल्या जागा सोडूनच युतीचे जागा वाटप होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले असल्याने या मतदारसंघात भाजपची ताकद वाढविण्यासाठीच या सभा लावण्यात आल्याचे बोलले जात आहे.
युतीचा निर्णय झाल्याशिवाय पक्षप्रवेश नाही
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपात काँग्रेस व राष्टÑवादीतून मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र भाजपाच्या एका पदाधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार सेना-भाजप युतीबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत हे पक्षप्रवेश होणार नाहीत. कारण युती झाली तर पक्षप्रवेश केलेल्या इच्छुकांना संधी देता येणार नाही. युती न झाल्यास मात्र पक्षप्रवेश देऊन भाजपचा विद्यमान आमदार नसलेल्या मतदारसंघांमध्ये आयारामांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.