गांधींजींच्या विचारांचा प्रभाव; नंतर एकही दंगल झाली नाही! - राह नबा कुमार
By अमित महाबळ | Published: December 17, 2023 09:23 PM2023-12-17T21:23:28+5:302023-12-17T21:24:03+5:30
रविवारी जळगावमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते
अमित महाबळ, जळगाव: भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी नौखालीत धार्मिक दंगली उसळल्या होत्या. त्या थांबाव्यात म्हणून महात्मा गांधीजींनी ज्या गावांमध्ये दौरा केला होता तेथे नंतरच्या काळात, अगदी आजपर्यंत एकही दंगल झालेली नाही. हा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव आहे, असे प्रतिपादन राह नबा कुमार यांनी केले. ते रविवारी, जळगावमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.
राह नबा कुमार म्हणाले, की १९४६-४७ च्या दरम्यान नौखालीत धार्मिक दंगली उसळल्या होत्या. हा भाग आता बांगलादेशात आहे. या दंगली थांबाव्यात म्हणून त्यावेळी महात्मा गांधी चार महिने नौखालीत थांबले होते. त्यांनी ज्या गावात भेट दिली, दंगली थांबवल्या तेथे आजपर्यंत एकही धार्मिक दंगल झालेली नाही. दोन वर्षांपूर्वी, सन २०२१ मध्ये दुर्गापूजेवेळी बांगलादेशात दंगलींनी जोर धरला होता. नौखालीत हिंदूंच्या धार्मिक स्थळांना नुकसान पोहोचविण्याचा काही जणांकडून प्रयत्न झाला मात्र स्थानिक मुस्लिमांनी या ठिकाणांना संरक्षण पुरवले होते. हे गांधीजींच्या विचारांचे यश आहे, असेही राह नबा कुमार म्हणाले. आश्रमाच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
...तरच विधायक वळण मिळेल
तरुणाईच्या हातात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे पण त्यावर दुर्दैवाने एकमेकांच्या धर्माबद्दल अपप्रचार करणाऱ्या आणि सामाजिक तेढ निर्माण होईल अशा पोस्ट शेअर केल्या जातात. गांधींजींचे विचार तरुणाईपर्यंत पोहोचले तर त्यांच्या विचारांना विधायक वळण मिळेल. एकत्र राहिलो तर शांती व अहिंसा ही तत्त्वे यशस्वी होतील, असे राह नबा कुमार यांचा मुलगा अनन्य याने सांगितले.
कोण आहेत राह नबा कुमार...
आंतरराष्ट्रीय स्तरावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार केल्याबद्दल यंदाच्या जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित बांगलादेशातील नौखाली येथील महात्मा गांधी आश्रम ट्रस्टचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राह नबा कुमार आहेत. ते व त्यांच्या पत्नी तंद्रा बारुआ, मुलगा अनन्य गांधीतीर्थला भेट देण्यासाठी जळगावला आले होते.