शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी शासनाने मागविली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 11:52 AM2019-12-04T11:52:08+5:302019-12-04T11:52:49+5:30
पात्र शेतकऱ्यांसह थकबाकीदारांच्या माहितीचे संकलन
जळगाव : शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर नवीन सरकारकडून शेतकरी कर्जमाफीबाबत हालचाली सुरू झाल्या असून सहकार विभागाकडून यासाठी माहिती मागविण्यात येत आहे. यामध्ये कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरू शकतात, थकबाकीदार शेतकºयांची संख्या व इतर माहितीचा समावेश असून त्यासाठी सहकार विभागाकडून ही माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू झाले.
शेतकरी कर्जमाफीसाठी या पूर्वीच्या सरकारच्या काळात अगोदर राजकीय पक्षांचे आंदोलन व नंतर स्वत: शेतकºयांनीच सुरू केलेल्या आंदोलनानंतर तत्कालीन राज्य शासनाने दीड लाखांपर्यंतच्या थकबाकीला कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यातही आधी २०१२ ते २०१६ पर्यंतचे थकबाकीदार शेतकºयांचा समावेश होता. नंतर त्यात सुधारणा करून २००९ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकºयांचा समावेश करण्यात आला. यासाठी जिल्ह्यातून वेगवेगळ््या याद्या मागविण्यात आल्या. सोबतच यामध्ये अनेक जाचक अटी असल्याने अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहत आले. अद्यापही जिल्ह्यातील ४० ते ४५ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत.
त्यात आता राज्यातील महाराष्टÑ विकास आघाडीच्या सरकारने सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार सरकारकडून शेतकरी कर्जमाफीसाठी हालचाली सुरू झाल्या. त्यानुसार यासाठी जिल्हा स्तरावरून माहिती मागविण्यात येत आहे.
यात या योजनेसाठी किती शेतकरी पात्र ठरू शकतात, त्यांची संभाव्य संख्या, थकबाकीदार शेतकºयांची संख्या, कोणाकडे किती वर्षापासून थकबाकी आहे, इत्यादी माहिती मागविली जात आहे. यासाठी सहकार विभागाकडून ही माहिती एकत्रित करणे सुरू आहे.
घोषणा तर झाली आहे, मात्र अगोदरच्याच योजनेतील हजारो शेतकरी लाभापासून वंचित असल्याने प्रत्यक्षात नवीन कर्जमाफी योजनेबाबत काय निर्णय होतो, त्यात काय अटीशर्थी लावल्या जातात व प्रत्यक्षात कधी लाभ मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.