सुरुवातीला समान मते नंतर ईश्वरचिठ्ठीने मिळाली सरपंच पदाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:18 AM2021-02-16T04:18:28+5:302021-02-16T04:18:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिरसोली प्र.बो. ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली. सरपंच पदाच्या निवडीवेळी नाट्यमय घडामोडी झाल्या. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिरसोली प्र.बो. ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली. सरपंच पदाच्या निवडीवेळी नाट्यमय घडामोडी झाल्या. सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या दोघा उमेदवारांना समान मते पडली. त्यानंतर ईश्वर चिठ्ठी काढल्यानंतर सरपंचपदी प्रदीप रावसाहेब पाटील यांची निवड घोषित करण्यात आली.
शिरसोली प्र.बो. ग्रा.पं.च्या सरपंचपदासाठी निवडणूक झाली. सरपंचपदासाठी सीमा प्रवीण पाटील, प्रदीप रावसाहेब पाटील, डिगंबर रामकृष्ण बारी व प्रवीण अशोक बारी यांनी तर उपसरपंच पदासाठी नितीन बुंधे व समाधान जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दरम्यान, प्रदीप पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे गुप्त मतदान पद्धतीने प्रक्रिया राबविण्याबाबत अर्ज केला. त्यानंतर सरपंच पदासाठीचे उमेदवार प्रवीण बारी व सीमा पाटील यांनी माघार घेतली.
सरपंच व उपसरपंच पदासाठी गुप्त पद्धतीने मतदान झाले. एक सदस्य तटस्थ राहिल्याने प्रदीप पाटील व डिगंबर बारी यांना समान ८ मते पडली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिका-यांनी तेजस बारी या मुलाच्या हातून ईश्वर चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेतला. त्यात प्रदीप पाटील यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने सरपंचपदी त्यांची निवड जाहीर करण्यात आली. उपसरपंच पदाचे उमेदवार नितीन बुंधे यांना ८ तर समाधान जाधव यांना ९ मते मिळाल्याने जाधव यांना उपसरपंचपदी निवड घोषित करण्यात आली.
यावेळी ग्रा.पं. सदस्य अबुबकर शकील खाटीक, फौजिया शोएब खाटीक, शेख रइस इलियास, निर्मलाबाई भिल्ल, सीमा प्रवीण पाटील, आशाबाई ढेंगळे, उषा अर्जुन पवार, भारती पाटील, रूपाली नेटके, आशाबाई बारी, शीतल खलसे, श्रद्धा काटोले या ग्रा.पं. सदस्याची उपस्थिती होती.