अमळेनरात फेरीवाला धोरण गुंडाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 01:06 AM2019-02-12T01:06:41+5:302019-02-12T01:08:18+5:30
अमळनेर शहरात फेरीवाला धोरण राबवण्याऐवजी ते गुंडाळले गेल्याने फेरीवाल्यांची मुजोरी वाढली असून सामान्य नागरिकाला ते उघडपणे दादागिरी करू लागले आहेत. विक्रेत्यांनी रस्ते अडविल्याने वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे
अमळनेर : शहरात फेरीवाला धोरण राबवण्याऐवजी ते गुंडाळले गेल्याने फेरीवाल्यांची मुजोरी वाढली असून सामान्य नागरिकाला ते उघडपणे दादागिरी करू लागले आहेत. विक्रेत्यांनी रस्ते अडविल्याने वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे
शहरातील मुख्य भाजीपाला मार्केट परिसर, लालबाग पाण्याच्या टाकीचा परिसर, सुभाष चौक ते कुंटे रोड , गंगा घाट, बसस्थानक परिसरात हातगाड्या व किरकोळ विक्रेत्यांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. त्यामुळे वाहतूक खोळंबते. महिला, आबालवृद्धांना जाण्यास जागा नसते फेरीवाले रस्त्यातून हलायला तयार नसतात. उलटपक्षी बाजूला होण्यास सांगितले तर दादागिरी करतात हातगाडी हलवत नाहीत, अशा तक्रारी आहेत. शासनाच्या आदेशानुसार पालिकेने फेरीवाला धोरण राबविण्याचा निर्णय घेतला होता परंतु त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. समितीची बैठक होते की नाही ही देखील शोधाची बाब आहे. फेरीवाला धोरणात हातगाड्यांना क्रमांक देऊन त्यांना विभाग ठरवून द्यायचा आहे. ज्या त्या भागातील हातगाड्या त्यांच्याच भागात पाहिजे इतरत्र आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र हातगाड्यांचे शहराच्या मध्यवर्ती भागात केंद्रीकरण झाले असल्याने बेशिस्त वर्तन हातगाडी चालकांकडून घडत असल्याच्या तक्रारी आहेत.
शहराची हद्द वाढल्यामुळे चारही दिशांना भाजीपाला बाजार असला पाहिजे मात्र तसे होताना दिसत नाही. वाटेल तिथे रस्त्यावर गाडया उभ्या करून पाहिजे त्यावेळी माल विकायला उभे राहत असल्याने प्रवाशी वाहनांना थांबावे लागते. किरकोळ विक्रेत्यांसाठी न.पा ने लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ ओटे बांधून दिले होते . मर्यादा रेषा आखून दिली होती परंतु सर्व मर्यादा ओलांडून रस्त्यावर गाड्या उभ्या असतात. तथापि न. प. चे अधिकारी किंवा कर्मचारी कारवाई करताना दिसत नाहीत.एक विशिष्ट समाजाच्या दबावाला बळी पडून कारवाई होत नसल्याचे बोलले जाते.