जळगाव येथे भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात बालिकेच्या डोळ््याला गंभीर इजा, शस्त्रक्रियेदरम्यान पडले ५० टाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:41 PM2018-05-10T12:41:31+5:302018-05-10T13:32:13+5:30
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १० - शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढतच असून दादावाडी परिसरातील कल्याणीनगरातील योगिता योगेंद्र बढे (१०) या बालिकेच्या डाव्या डोळ््याचा भटक्या कुत्र्याने कडाडून चावा घेतल्याने तिच्या डोळ््याला ५० टाके पडले आहेत. या हल्यात डोळ््यासह हात व पायाचाही कुत्र्याने लचका तोडला असून बालिकेच्या डोळ््याची बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात आली.
कल्याणीनगरातील रहिवासी व नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयाची विद्यार्थिनी योगिता बढे ही ७ रोजी दुकानावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडली व थोडी पुढे जात नाही तोच भटक्या कुत्र्याने हल्ला करीत थेट तिच्या डाव्या डोळ््याचा कडाडून चावा घेतला. या वेळी काही नागरिक तेथे बसले असताना त्यांना ही मुलगी कुत्र्यासमोर खेळत आहे, असे वाटले. मात्र कुत्रा तिला चावा घेत असल्याचे लक्षात येताच तिची सुटका करण्यात आली. या हल्यात बालिकेच्या डोळ््यात खोलवर जखम झाली असून तिच्या हात, पाय व पार्श्व भागाचाही कडाडून चावा घेतल्याने बालिका गंभीर जखमी झाली. या वेळी तिला तत्काळ खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.
डोळ््याला इतक्या खोलवर जखम झाली आहे की, उपचार करणेही कठीण होत. अखेर ९ रोजी या मुलीच्या डोळ््यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये डोळ््याच्या आत व बाहेर असे जवळपास ५० टाके पडल्याचे तिचे वडील योगेंद्र बढे यांनी सांगितले.
शहरात मोकाट कुत्र्यांच्या या वाढत्या दहशतीमुळे शहरवासीय त्रस्त असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी मनपाने सहा वेळी निविदा काढल्या, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. मनपा कडून प्रयत्न सुरू आहेत.
- उदय पाटील, आरोग्य अधिकारी मनपा.