इतर रुग्णांवरील अन्याय दूर करावा - गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 01:10 PM2020-05-17T13:10:04+5:302020-05-17T13:10:44+5:30
मुख्यमंत्र्यांना लिहीले पत्र
जळगाव : कोरोनाच्या उपाययोजना व उपचारासाठी सर्वच यंत्रणा कार्यान्वित असली तरी इतर आजारांच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच अनेक ठिकाणी अधिकचे शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे त्यांच्यावरील हा अन्याय दूर करावा व त्यांना योग्य उपचार मिळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाचा चांगलाच कहर सुरू आहे. यंत्रणेमार्फत त्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र इतर रुग्णांवर उपचार होत नसल्याचे चित्र आहे. या संदर्भात गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठविले असून त्यात म्हटले आहे की, एकतर कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णांना उपचार मिळत नाही तर काही ठिकाणी अशा उपचारासाठी डॉक्टरांकडून अधिकचे शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे रुग्णांची एक प्रकारे लूट सुरू असून त्यांच्यावर अन्याय होत आहे. सर्वच आजाराच्या रुग्णांना उपचार मिळावे यासाठी निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी महाजन यांनी केली आहे.