प्रभाग आरक्षणामध्ये गाव पुढाऱ्यांवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 11:32 PM2020-02-20T23:32:05+5:302020-02-20T23:36:08+5:30
आरक्षण काढताना प्रशासनाच्या दुटप्पी धोरणामुळे ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे.
उत्तम काळे
भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यात वरणगाव नगर पंचायतीसह २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका यंदा होणार आहेत. त्यासाठी नुकतेच ग्रामपंचायतीसह नगरपंचायतीच्या प्रभागांचे आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. मात्र आरक्षण काढताना वरणगाव नगरपंचायतीच्या प्रभागासाठी चिठ्ठी काढून, तर ग्रामीण भागासाठी मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातून आलेल्या आदेशाप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नगरपंचायतीसाठी वेगळा, तर २६ ग्रामपंचायतींसाठी वेगळा न्याय का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासनाच्या या दुटप्पी धोरणामुळे ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
दरम्यान, ३ फेब्रुवारी रोजी काढण्यात आलेल्या आरक्षणाच्या वेळी मंडळ अधिकाऱ्यांनी आपण अपिलात जा आणि तहसील आणि प्रांताधिकारी कार्यालयामध्ये हेलपाटे खा, अशी भूमिका का घेतली आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या ठिकाणी होणार निवडणुका
तालुक्यातील कुºहे (पानाचे), मन्यारखेडा, काहूरखेडा, साकेगाव, कंडारी, खडका, किन्ही, फेकरी, खंडाळे, शिदी, पिंपळगाव बुद्रूक, जोगलखेडा, बोहर्डी, टाहाकळी, कंडारी, पिंपळगाव खुर्द, बेलव्हाय, पिंपरी सेकम, दर्यापूूर, आचेगाव, सुसरी, बेलव्हाय, पिंपरी सेकम, वांजोळे, कठोरे या २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची मुदत जुलै ते डिसेंबरमध्ये संपत आहे. यासाठी ३ फेब्रुवारी रोजी तालुक्यामध्ये प्रभागांचे आरक्षण काढण्यात आले.
दवंडी न देताच सभा
महसूल विभागाकडून सर्वच ग्रामपंचायतींना विशेष सभा घेण्याचे दवंडी देऊन सभेसाठी ग्रामस्थांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र कुºहे ( पानाचे) सह बहुतांशी ग्रामपंचायतीने दवंडी न देताच मर्जीतील लोकांना बोलावून विशेष सभा दाखविण्यात आल्या. यात मंडळ अधिकाºयांनी कागदावर तयार करून आणलेले प्रभागातील आरक्षण वाचून दाखवले.
यावेळी हे आरक्षण कोणत्या पद्धतीने काढण्यात आले आहे. यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातून हे आरक्षण काढण्यात आले आहे, असे सांगून काही अपील असल्यास तहसील कार्यालय, प्रांतांकडे अपील करावे, असे यावेळी सांगण्यात आले.
वरणगाव येथील नगरपंचायतीच्या प्रभागांचे आरक्षण काढण्यासाठी नगरपंचायतीतर्फे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने होते. यावेळी इतर अधिकारी व पदाधिकारीही उपस्थित होते.
वरणगाव नगरपंचायतीच्या एकूण १८ प्रभागांमधील आरक्षण काढताना एका लहान मुलीच्या हस्ते काढलेल्या चिठ्ठीवरून आरक्षण जाहीर करण्यात आले. ग्रामपंचायतीला मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या यादीनुसार आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामुळे हा दुजाभाव का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.