जळगाव येथे कारागृहात कैद्याने स्वत:वर केला धारदार शस्त्राने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 12:23 PM2019-10-04T12:23:50+5:302019-10-04T12:29:24+5:30
न्यायालयीन तारखेला मुकला
जळगाव : न्यायालयीन तारखेवर हजर न केल्याने रवीसिंग मायासिंग बावरी याने पत्र्याच्या धारदार तुकड्याने स्वत:च्या हातावर वार केल्याची घटना गुरुवारी दुपारी दीड वाजता कारागृहात घडली. कारागृह कर्मचाऱ्यांच्या वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे कारागृहात एकच खळबळ उडाली.
रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात रवीसिंग मायासिंग बावरी, सत्यासिंग मायासिंग बावरी व मलीनसिंग मायासिंग बावरी हे तीन भाऊ आरोपी आहेत. २०१७ पासून हे तीनही न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात आहेत. गुरुवार दि, 3 आॅक्टोबर रोजी रवीसिंग बावरीसह दोन्ही भावांची न्यायालयात तारीख होती. बावरी बंधूना न्यायालयात हजर करण्याकरीता मागणीप्रमाणे पोलीस पथक न आल्याने त्याला हजर ठेवता आले नाही. न्यायालयात हजर न केल्याचा संतापात दुपारी रवीसिंग बावरी याने लोखंडी पत्र्याच्या तुकड्याने दोन्ही हातावर वार करण्यास सुरुवात केली. हा प्रकार लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले.
गार्ड न मिळाल्याने हजर करता आले नाही
कैद्यांना न्यायालयात तारखेवर हजर करण्यापूर्वी पोलीस विभागाला गार्ड म्हणून कर्मचारी मिळावे म्हणून पत्रव्यवहार करण्यात येतो. त्यानुसार ३ रोजी बावरी यांच्यासह ज्या कैद्यांना न्यायालयात हजर करावयाचे होते. त्यासाठी १ आॅक्टोबरला पोलिसांना पत्र देण्यात आले. तरीही गुरुवारी १ वाजेपर्यंत गार्ड म्हणून एकही कर्मचारी आला नाही. पोलीस पथक नसल्याने कैद्याचे रिमांड वारंट तारीख वाढविण्यासाठी न्यायालयात पाठविण्यात आले होते.
जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी कारागृहात शासकीय कामात अडथळा आणून कारागृहातील सुरक्षा व शिस्तीस बाधा आणून नियमांचे उल्लंघन केला तसेच कारागृह प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करुन गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन केले आहे. याप्रकरणी हवालदार विजय निकम यांच्या फिर्यादीवरुन रविसिंग मायासिंग बावरी याच्याविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयात हजर करावयाच्या बंदीकरीता पोलीस पथक मिळावे म्हणून १ आॅक्टोबर रोजी पोलीस मुख्यालयाला पत्र देण्यात आले होते. मात्र मागणीनुसार पथक न आल्याने बावरी भावांना न्यायालयात हजर करता आले नाही. त्यामुळे रविसिंग बावरीने ते स्वत:वर पत्र्याने वार केले. वरिष्ठांना तसेच न्यायालयात याबाबत कळविण्यात येणार आहे.
-अनिल वांढेकर, प्रभारी अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कारागृह