अंजली दमानिया यांची चौकशी करा : एकनाथराव खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 10:03 PM2018-04-17T22:03:32+5:302018-04-17T22:03:32+5:30
मुख्यमंत्र्यांकडे केली विशेष तपास पथकामार्फत चौकशीची मागणी
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१७ : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माझ्याविरुध्द रचलेल्या कटकारस्थानाची बृहन्मुबई पोलीस आयुक्त यांच्या अंतर्गत विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. खडसे यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.
खडसे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून अंजली दमानिया या माझ्या व माझ्या कुटुंबियांविरुध्द बेछुट आरोप करीत आहेत. त्यांच्या या आरोपांचे खंडन वेळावेळी प्रसारमाध्यमे, विधीमंडळ तसेच विविध पक्षांच्या जाहीर सभांमधून केलेले आहे.
दमानिया यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे चौकशीतून निष्पन्न झालेले आहे, मात्र तरीही दमानिया यांच्याकडून आरोप करण्याचे प्रकार थांबत नाहीत. खडसे कुटुंबाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न दमानिया यांच्याकडून हेतुपुरस्सर केला जात आहे.
कल्पना इनामदार घटनाक्रम मांडण्यास तयार
सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन अंजली दमानिया या खडसे यांना अडकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले होते. मला खडसेंना अडकवायचे आहे. त्यासाठी मी तुम्हाला पैसे देते, त्यासोबत काही पत्र देते. त्यासंदर्भात तुम्ही खडसे यांच्या कार्यालयात जा व पैसे खडसे यांच्या टेबलावर ठेवा त्यानंतर मी लगेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला घेऊन येते असे दमानिया यांनी इनामदार यांना सांगितले. इनामदार यांनी असे करण्यास नकार दिल्यानंतरही तीन तास त्यांना समजावण्यात आले. हा सारा प्रकार इनामदार या पोलिसांसमोर मांडण्यास तयार आहेत. इनामदार यांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे हे तपासण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करुन त्यामार्फत चौकशी करावी अशी मागणी खडसे यांनी केली आहे.