पाणी टँकर घोटाळाप्रकरणी फैजपूर प्रांताधिकाऱ्यांकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 07:29 PM2019-05-25T19:29:09+5:302019-05-25T19:33:50+5:30
भुसावळ तालुक्यातील महादेव तांडा येथील पाणी टँकर गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात फैजपूर येथील प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी शनिवारी चौकशी केली असून, तालुक्यात ज्या गावांना टँकर देण्यात आले आहे, त्या गावांना भेटी देऊन पाहणी केली.
उत्तम काळे
भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील महादेव तांडा येथील पाणी टँकर गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात फैजपूर येथील प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी शनिवारी चौकशी केली असून, तालुक्यात ज्या गावांना टँकर देण्यात आले आहे, त्या गावांना भेटी देऊन पाहणी केली. दरम्यान, यासंदर्भात नागपूर येथील आमदार सुनील केदार यांनी लक्षवेधी टाकली आहे. त्यामुळे टँकर माफियामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
‘लोकमत’ने यासंदर्भात स्टिंग आॅपरेशन केले होते व या भ्रष्टाचाराचा पदार्फाश केला आहे. याची दखल घेऊन जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी जिल्हा परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संबंधित अधिकाºयांना दिले आहे, तर आमदार केदार यांनी या प्रकरणाची दखल घेतली घेतली आहे व त्यांनीही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात यासंदर्भातील लक्षवेधी दाखल केली आहे, तर जिल्हाधिकाºयांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी फैजपूर येथील प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांची नियुक्ती केली असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात डॉ.थोरबोले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
प्रांताधिकारी डॉ.थोरबोले यांनी शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कुºहे (पानाचे) येथील ग्रामपंचायत कार्यालयात येऊन या प्रकरणाचे ग्रामविकास अधिकारी पी.टी. झोपे यांच्याकडून काही कागदपत्रांची मागणी व चौकशी केली. त्याचप्रमाणे त्यांनी महादेव तांडा येथे जाऊन माहिती घेतली, तर भुसावळ तालुक्यातील टँकर सुरू असलेल्या कन्हाळा बुद्रूक, कंडारी, भुसावळ ग्रामीण आदी ठिकाणीही जाऊन पाहणी केली.
यावेळी प्रांताधिकारी थोरबोले यांच्यासोबत पंचायत समितीचा एक अधिकारी असल्याचे दिसून आले. या प्रकरणी पंचायत समितीचे संबंधित अधिकारी योग्य ती माहिती देत नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ही चौकशी कशी होते, यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.
यावेळी प्रांताधिकारी डॉ.थोरबोले यांनी टँकरमधील लॉक बुक, रजिस्टर, ट्रँकर कुठे भरले जाते, कुठे खाली केले जाते यासंदर्भात चौकशी केल्याचे सांगण्यात आले.
‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केले त्यावेळी महादेव तांड येथील रजिस्टर कोरे होते. कोºया रजिस्टरवर महिलांच्या सह्या घेण्यात आल्या होत्या. या रजिस्टरवर टँकर कुठे भरले, कुठून आले, किती वाजता आले, कोणतीही माहिती भरण्यात आलेली नव्हती, तर भुसावळ ग्रामीण येथे तर रजिस्टरही उपलब्ध नव्हते. एका नोटबुकवर केवळ सह्या घेण्यात आल्या होत्या. या रजिस्टरमध्येही कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशननंतर मात्र पंचायत समितीने नंतर रजिस्टर पूर्ण करण्याचा प्रताप केला असल्याचे समजते.
दरम्यान, नागपूर येथील काँग्रेसचे आमदार केदार त्यांनी विधानसभेत लक्षवेधी (क्रमांक १४०४०) टाकलेली आहे. यामध्ये महादेव तांडा येथे गेल्या वर्षभरापासून एमएच-१९-झेड-१२२० या टँकरने पाणीपुरवठ्यासंदर्भातील विचारणा केली असून, विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. ही लक्षवेधी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री त्याचप्रमाणे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे दाखल केली आहे.