तरूणाच्या मृत्यूप्रकरणात पहुर रुग्णालयात चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:13 AM2021-07-21T04:13:00+5:302021-07-21T04:13:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव/ पहूर, ता.जामनेर : सर्पदंश झालेल्या पहूर येथील विनोद फकिरा चौधरी (वय ४८) यांना वेळेवर उपचार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव/ पहूर, ता.जामनेर : सर्पदंश झालेल्या पहूर येथील विनोद फकिरा चौधरी (वय ४८) यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हा आरेाग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांना दिल्यानंतर चौकशी समितीने पहूर येथील रुग्णालयात जावून या संदर्भात चौकशी केली. पहूर येथे प्राथमिक उपचार झाले. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार न मिळाल्याचा जबाब मृत तरूणाच्या भावाने समितीला दिला आहे.
पहूर रुग्णालयात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा व वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत या समितीने मंगळवारी चौकशी केली. यावेळी पहूर रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परेश जैन, डॉ किर्ती पाटील व मृत युवकाचा भाऊ योगेश चौधरी उपस्थित होते. दरम्यान, दिरंगाई शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाली असताना पहूर येथील चौकशी का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भावाने दिलेला जबाब असा
योगेश चौधरी यांनी चौकशी समितीला लेख दिले असून त्यात म्हटले आहे की, शेतात काम करीत असताना त्याला काहीतरी चावले, तो माझ्याकडे आल्यानंती मी त्याला पहूर रुग्णालयात आणले. या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर भावाला चक्कर येणे व डोळे जड होण्याचा त्रास असल्याने आम्ही खासगी वाहन करून सिव्हीलला आलो. मात्र, येथे त्यांनी कोणतेही उपचार केले नाही. आम्हाला गोदावरी रुग्णालयात जाण्यास सांगितले. आम्ही या ठिकाणी खूप विनवण्या केल्या मात्र, सुविधा नसल्याचे सांगत आम्हाला डाॅ. उल्हास पाटील हॉस्पिटललाच पाठविले. तिथे गेल्यानंतर खूप वेळ झाला होता व भाऊ विनोदचा मृत्यू झाल्याचे योगेश चौधरी यांनी लिहून दिले आहे.
काय झाले होते सिव्हिलला?
विनोद चौधरी यांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात आणल्यानंतरच वैद्यकिय अधिकारी डॉ.सचिन अहिरे यांनी त्यांना रुग्णाला डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला होता. या ठिकाणी उपचार मिळाले असते तर माझा भाऊ वाचला असता, यंत्रणेच्या फिरवाफिरवमुळे भावाचा मृत्यू झाल्याचे योगेश चौधरी यांनी तेव्हा म्हटले होते.
कोट
पहूर येथील मृत्यूसंदर्भात नेमके काय झाले याबाबत चौकशी करण्याच्या जिल्हाधिकारी यांनी सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार ही चौकशी सुरू आहे. - डॉ. बी. टी. जमादार, जिल्हा आरोग्य अधिकारी
कोट
नातेवाईकांनी रुग्णाला रुग्णवाहिकेच्या खालीच उतरवले नाही. आम्हाला डाॅ. उल्हास पाटील रुग्णालयात लवकर जायचे आहे, अशीच मागणी ते करीत होते. आपल्याकडे रुग्ण आल्यानंतर त्याला आधी तपासून प्राथमिक उपचार करून मगच तिकडे रेफर केले जाते. नातेवाईक थेट व्हेंटीलेटर आहे का? याची विचारणा करत होते. कदाचित रुग्णाचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला असावा, आम्ही तपासणी करून त्याची खात्री केली असती, मात्र, रुग्णांनी त्यांना खालीच न उतरवता थेट रेफर लेटर मागीतले. - डॉ. सचिन अहिरे, वैद्यकीय अधिकारी, जीएमसी, जळगाव