जळगावात सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीसाठी कामगार निरीक्षकांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:05 PM2018-07-17T13:05:25+5:302018-07-17T13:06:09+5:30
तासभर ठिय्या
जळगाव : सुरक्षारक्षक मंडळाने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्ती न दिल्याने, जळगाव,धुळे, नंदुरबार येथून आलेल्या संतप्त युवकांनी सोमवारी कामगार निरीक्षक सी.पी. पाटील यांना घेराव घातला. यावेळी धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनीही युवकांना पाठिंबा दिल्याने, संतप्त विद्यार्थ्यांनी तासभर या ठिकाणी माथाडी कामगार कार्यालयात ठिय्या मांडला होता.
शासनातर्फे धुळे, नंदुरबार व जळगाव या तीन जिल्ह्यांमध्ये सुरक्षारक्षक पदासाठी २०१५ मध्ये ५०० जागासांठी सुमारे ८ हजार युवकांनी अर्ज केले होते. त्यानंतर २६ ते २८ मार्च २०१६ या तीन दिवसांच्या कालावधीत युवकांच्या शारीरिक व मैदानी चाचण्या घेण्यात आल्या होत्या.
यातील ५०० जागांपैकी २७६ उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले होते. मात्र, मंडळातर्फे या पात्र उमेदवारांना दोन वर्षांपासून नियुक्ती पत्र देण्यात आलेले नाही.
यासाठी गेल्या दोन वर्षांपासून हे उमेदवार माथाडी व असंघटीत कामागार मंडळाच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र, येथील अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव पाठविला असल्याचेच उत्तर देण्यात येत होते. यावेळी काही गेल्या महिन्यात धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्यासोबत जाऊन मुख्यमंत्र्यांचींही भेट घेतली होती.
दोन वर्षांपासून पात्र उमेदवारांना नियुक्ती मिळत नसल्याने, माजी आमदार शरद पाटील यांनी गेल्या महिन्यांत काही युवकांना सोबत घेऊन, मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीदेखील भेट घेतली होती. यावेळी येथील रुपचंद चौधरी, आकाश भालेराव, सुनिल पवार, अनिल पवार, दशरथ राठोड, नटवर जाधव, मनोज जाधव, किरण परदेशी, ज्ञानेश्वर राठोड, हेमंत राठोड यासह ५० ते ६० युवकांनी तासभर ठिय्या मांडला होता.
काळे फासण्याचा इशारा
नियुक्ती संदर्भातील होत असलेल्या दिरंगाई बद्दल सी.पी. पाटील यांच्याकडून व्यवस्थित उत्तरे मिळत नसल्याने, संतप्त झालेल्या शरद पाटील यांनी मुख्य कामगार आयुक्तांशी मोबाईल वरुन संपर्क साधला. दोन वर्षांपासून होत असलेल्या दिरंगाईबद्दल चांगलेच धारेवर धरले. तसेच आठवडाभरात युवकांच्या नियुक्ती संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा मुंबईला येऊन, चेहºयाला काळे फासू अशा इशाराही शरद पाटील यांनी मोबाईलवरुन दिला.
माजी आमदारांकडून आंदोलनाचे नेतृत्त्व
प्रशासनातर्फे कुठलेही समाधान कारक उत्तर मिळत नसल्याने, सोमवारी दुपारी विविध ठिकाणचे ५० ते ६० युवक गांधी उद्यानाजवळ एकत्र जमले होते. यावेळी माजी आमदार प्रा.शरद पाटीलदेखील या युवकांसोबत हजर होते.या ठिकाणाहूनच युवकांनी जोरदार घोषणाबाजी करत, भास्कर मार्केटसमोरील माथाडी कामगार मंडळाच्या कार्यालयावर धडकले. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करुन, येथील कामगार निरीक्षक सी.पी.पाटील यांना घेराव घालून, दोन वर्षांपासून रखडलेल्या नियुक्त्यांसदर्भात प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात केली. यावेळी शरद पाटील यांनीदेखील पाटील यांना चांगलेच धारेवर धरले होते.