सराफ दुकान लुटीप्रकरणी केली सीसीटीव्ही फुटेजची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:12 AM2021-07-09T04:12:39+5:302021-07-09T04:12:39+5:30
यावल : येथील बाजीराव काशिदास कवडीवाले यांच्या सराफ पेढीवर बुधवारी अज्ञात चार चोरट्यांनी दरोडा टाकून ५५ हजार रुपयांच्या रोकडसह ...
यावल : येथील बाजीराव काशिदास कवडीवाले यांच्या सराफ पेढीवर बुधवारी अज्ञात चार चोरट्यांनी दरोडा टाकून ५५ हजार रुपयांच्या रोकडसह साडेअकरा लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा विभागाकडून शहरातील विविध ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजची पाहणी केली. दरम्यान, त्यातील एका संशयितावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पालकमंत्री पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी संबंधित पेढीवर भेट देत घटनेचा आढावा घेतला व तपास अधिकारी यांना कसून तपासाचे आदेश दिले आहेत. दरोड्याच्या घटनेची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही दिली असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही पोलिसांना कसून तपासाचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली.
शहरातील कोर्ट रस्त्यावरील बाजीराव काशिदास कवडीवाले यांच्या सराफा पेढीवर बुधवारी चार अज्ञात चोरट्यांनी देशी कट्ट्याचा धाक दाखवून शोकेस फोडून त्यातील २४० ग्रॅम सोने व ५५ हजार रुपयांची रोकड असा साडेअकरा लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह विभागाचे अधिकारी येथे कसून तपास करीत आहेत. दुकानाचे संचालक तथा शिवसेनेचे शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांनी केलेल्या वर्णनानुसार चोरट्यांचा ग्रामीण भागासह जिल्ह्यात शोध घेतला जात असल्याचे तपास अधिकारी यांनी सांगितले.
उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक बखाले हे पथकांसह विविध भागात तपास करीत आहेत.