चाळीसगाव कृषी दुकानांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:11 AM2021-06-11T04:11:46+5:302021-06-11T04:11:46+5:30
चाळीसगाव : कृषी विभागाच्या भरारी पथकाने बुधवारी शहरातील कृषी साहित्य विक्रेत्यांकडे धडक देत दुकानांची तपासणी केली. एकाच दिवशी १४ ...
चाळीसगाव : कृषी विभागाच्या भरारी पथकाने बुधवारी शहरातील कृषी साहित्य विक्रेत्यांकडे धडक देत दुकानांची तपासणी केली. एकाच दिवशी १४ दुकानांमध्ये जाऊन पथकाने बियाणे, खते आदिंबाबत आढावा घेऊन दुकानदारांना योग्य त्या सूचना केल्या. कपाशी बिटी बियाण्यांचे बहुसंख्य वाण उपलब्ध असून, दुकानदारांना सर्व रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सी. डी. साठे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाले असून, मृग नक्षत्राच्या दमदार पावसानंतर पेरण्यांना वेग येणार आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. बियाणे, खते व इतर कृषी साहित्य खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी पंचायत समितीच्या कृषी विभागात तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे भरारी पथकही यावर नजर ठेवून आहे. बुधवारी याच अनुषंगाने दिवसभरात पथकाने शहरातील १४ दुकानांची तपासणी केली. शेतकऱ्यांनी बियाणे, खते व इतर कृषी साहित्याबाबत तक्रार निवारण कक्षात तक्रार नोंदविल्यास तत्काळ दखल घेतली जाईल, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
कृषी साहित्याची ३५० दुकाने
शहर परिसरात ८०, तर ग्रामीण भागात २७० अशी एकूण ३५० कृषी साहित्य विक्रीची दुकाने आहेत. कृषी विभागाच्या भरारी पथकाने शहरातील दुकानांची तपासणी करुन बियाणे, खते साठा व उपलब्धता याची पडताळणी केली. या पथकात कृषी अधिकारी सी. डी. साठे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी भालेराव, माधवी घोरपडे, व्ही. यू. सूर्यवंशी, पल्लवी हिवरे यांचा समावेश आहे. दुकाने तपासणीची मोहीम सुरूच राहणार आहे.
..........
चौकट
दुकानदारांनी पाळावयाची आचारसंहिता
पथकाने दुकानांची तपासणी करून काही निर्देशही दिले आहेत. यावर पथकाची करडी नजर राहणार आहे.
- खते, बियाणे साठा नोंदवही ठेवणे
- बिल बुक आवश्यक
- प्रत्यक्ष उपलब्ध साठ्याची माहिती
- खते, बियाणे उपलब्ध असल्याचा फलक
- सर्व नोंदवह्या अद्ययावत ठेवणे,
- ग्राहकाला खरेदी केलेल्या मालाची पावती त्वरित देणे
- बियाणे किंवा खताचे लिंकींग न करणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व सॅनिटायझरचा अवलंब करणे.
- मुदतबाह्य झालेली खते व बियाणे विक्री न करणे.
.......
चौकट
खते व बियाणे उपलब्ध
कपाशीसह मका, बाजरी, ज्वारी व इतर कडधान्यांचे प्रचलित बियाण्यांचे बहुतांश वाण उपलब्ध आहे. पेरण्यांना अद्यापपावेतो सुरुवात झालेली नाही. मृग नक्षत्रावर पडलेल्या दमदार पावसानंतर पेरण्यांना वेग येणार आहे. मान्सूनपूर्व कपाशीची लागवड मात्र केली जात आहे.
1...खतेही उपलब्ध झाली आहेत. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात युरिया खताची मागणी होते.
२..मात्र नत्रासोबत स्फुरद व पालाशही शिफारशीप्रमाणे द्यावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
..........
चौकट
७६ मिमी पावसाची नोंद
गेल्या काही दिवसात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाची नोंद कृषी विभागाने केली आहे. एकूण ७६ मिमी पावसाची नोंद केली गेली आहे.
===Photopath===
100621\10jal_2_10062021_12.jpg
===Caption===
चाळीसगाव कृषी दुकानांची तपासणी