मंडळाधिकारी, तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घातले
By admin | Published: February 9, 2017 12:29 AM2017-02-09T00:29:14+5:302017-02-09T00:29:14+5:30
चोपडा : तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
चोपडा : अवैध वाळू वाहतूक करणाºया ट्रॅक्टरला थांबविण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने मंडळाधिकारी व तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घातले. ही घटना ८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास वढोदा-घोडगाव रस्त्यावर घडली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तापी नदी पात्रातील वाढोदा येथून वाळू चोरी होत असल्याची माहिती हातेडचे मंडळाधिकारी रवींद्र साळुंके व वढोदा तलाठी महेंद्र पाटील यांना मिळाली होती. वाढोदा अजंतेसीम रस्त्यावर एक ब्रास वाळू भरलेले ट्रॅक्टर त्यांनी थांबविले.
चालकाची चौकशी केली असता, त्याने मालकाचे नाव सांगितले. वाळू चोरीची असल्याने मंडळाधिकारी व तलाठ्याने ते ट्रॅक्टर चोपडा येथे नेण्यास सांगितले.
मात्र चालकाने मालक किशोर कोळी यास फोन लावून बोलावले. थोड्यावेळात कोळीसह अन्य एकजण तेथे आला़
त्यांनी चोपड्याकडे ट्रॅक्टर घेऊन जातो, असे सांगत ट्रॅक्टर अजंतेसिम रस्त्यावर वळवत मंडळाधिकारी तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चालकाने ट्रॅक्टरसह शिरपूरकडे पळ काढला.
याबाबत मंडळाधिकारी रवींद्र साळुंके यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला सरकारी कामात अडथडा आणला व पाच हजार रुपये किमतीचे गौण खनिज चोरी केल्याप्रकरणी आरोपी मालक किशोर कोळी (रा.होळनांथे ता शिरपूर) याच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अद्याप कोणाला ताब्यात घेतलेले नाही. तपास उपनिरीक्षक नाना दाभाडे करीत आहेत. (वार्ताहर)