बहिणाबार्इंच्या कविता व जात्यावरच्या ओव्यांची प्रेरणा - कवी इंद्रजित भालेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:32 PM2018-06-17T12:32:08+5:302018-06-17T12:32:08+5:30
जळगावात साहित्य अकादमीतर्फे ‘कवी संधी’ कार्यक्रम
जळगाव : बहिणाबाई चौधरी यांच्या समग्र कविता, जात्यावरच्या ओव्या, महानुभाव पंथीय आणि कृषी संस्कृती हे आपल्या आयुष्याच्या संस्काराचे सूत्र असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी शनिवारी साहित्य अकादमीतर्फे झालेल्या कवी संधी कार्यक्रमाप्रसंगी केले.
व.वा.वाचनालयाच्या टिळक सभागृहात संध्याकाळी पुस्तक प्रदर्शन व कवी संधी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासह उर्दू भाषेचे अभ्यासक मोईनोद्दीन उस्मानी, साहित्य अकादमीचे क्षेत्रीय सचिव कृष्णा किंबहुने उपस्थित होते.
जात्यावरच्या हजारो ओव्या तोंडपाठ
बहिणाबाई यांच्या समग्र कवितांची जशी प्रेरणा होती तशी जात्यावरच्या ओव्यांची प्रचंड आवड होती. लोकसंस्कृती हा विषय शिकविणारे प्रभाकर मांडे सरांनी तोंडपाठ असलेल्या जात्यावरच्या ओव्या लिहून काढण्यास सांगितल्या.
ज्येष्ठ कवी महानोर व आपली प्रकृती एक नाही
अनेक कवींनी मला आपलेसे केले. सुरुवातीच्या काळात मला ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर यांच्या कविता प्रचंड आवडत होत्या. नंतर मात्र लक्षात आले की त्यांची आणि माझ्या कवितेची प्रकृती एक नाही. यासोबत कवी नारायण सुर्वे यांच्या कवितांचे सादरीकरण मला खूप आवडायचे.
तत्वज्ञानाला आव्हान देता आले पाहिजे
नंतरच्या काळात माझी कविता ही शेतकरी आणि महात्मा फुले यांच्या कार्यावर केंद्रीत राहिली.
पण हे सारे करीत असताना आपण स्विकारलेल्या तत्वज्ञानाला आव्हान देता आले पाहिजे असे वाटू लागले. त्यामुळे काही कालांतराने माझे मत बदलत गेल्याचे त्यांनी सांगितले.
कवितांची प्रेरणा मिळाली जळगावातून
इंद्रजित भालेराव म्हणाले, कविता लेखनाची खरी प्रेरणा आपल्याला जळगावातून मिळाली. शालेय जीवनात असताना बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांची गोडी लागली. ज्या गावात मी राहत होतो त्या गावात रोझोद्याचे बोरणारे गुरुजी होते. बहिणाबाई यांच्या कवितांची मला असलेली आवड पाहून त्यांनी मला उन्हाळी सुट्यांमध्ये आसोदा गावी नेले.
शेतीशी संबध नाही पण कविता
सध्या मी प्राध्यापक म्हणून काम करतो. शेतीशी काही संबध नाही. मात्र माझ्याशी संबधित व नात्यातील माणसे शेतीत आहेत. ते त्यांचे दुख: मांडू शकत नाहीत. त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या व्यथा आणि भावना मी मांडत असल्याचे भालेराव यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या निवडक कविता सादर केल्या.