जळगावात तरुणसागरजी महाराजांच्या ‘डोली सजा के रखना’ व ‘बेटी बिदाई’ने दिली शहरवासीयांना प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:51 PM2018-09-02T12:51:56+5:302018-09-02T12:55:07+5:30

आठ दिवस होता शहरात मुक्काम

inspiration to the residents of Tarunsagarji maharaj | जळगावात तरुणसागरजी महाराजांच्या ‘डोली सजा के रखना’ व ‘बेटी बिदाई’ने दिली शहरवासीयांना प्रेरणा

जळगावात तरुणसागरजी महाराजांच्या ‘डोली सजा के रखना’ व ‘बेटी बिदाई’ने दिली शहरवासीयांना प्रेरणा

Next
ठळक मुद्देजैन बांधवांसह सर्वच धर्मियांची मुनीश्रीच्या प्रवचनास असायची गर्दीनियोजित कार्यक्रम बदलून आले जळगावात

जळगाव : विज्ञान व वास्तविकतेवर भाष्य करून समाजातील अनिष्ट रुढी परंपरांवर परखड शब्दांमध्ये प्रहार करणारे क्रांतीकारी जैन संत प.पू. १०८ मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांनी जळगावातही आपल्या वास्तववादी भाष्यावरच भर देत केलेले प्रवचन आजही शहरवासीयांच्या स्मरणात आहे. मुनीश्रींच्या १४ वर्षांपूर्वीच्या ‘डोली सजा के रखना’ व ‘बेटी बिदाई’ या विषयावरील प्रवचनांच्या आठवणींना शनिवारी पुन्हा उजाळा मिळाला. ७ ते १५ जून २००४ या असे आठ दिवस जळगावातील त्यांच्या प्रवचनास केवळ जैन धर्मीयच नाही तर सर्व धर्मियांची उपस्थिती राहून त्यांचे प्रवचन सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरले.
क्रांतीकारी जैन संत प.पू. १०८ मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांचे १ सप्टेंबर रोजी पहाटे निधन झाल्याचे वृत्त समजताच जळगातही शोककळा पसरली. सकाळपासूनच जैन मंदिरांमध्ये तसेच समाजबांधव एकमेकांशी चर्चा करताना मुनीश्रींच्या आठवणींना उजाळा देऊ लागले. यामध्ये सर्वांच्या स्मरणात असलेला काळ म्हणजे २००४मध्ये आठवडाभर चाललेले त्यांचे प्रवचन.
नियोजित कार्यक्रम बदलून आले जळगावात
प.पू. तरुणसागरजी महाराज ज्या वेळी महाराष्ट्रात आले त्या वेळी तब्बल आठ दिवस त्यांचे सान्निध्य जळगाववासीयांना लाभले. गुजरात येथून नंदुरबारात आल्यानंतर त्यांना तेथे जाऊन शाकाहार सदाचारचे प्रणेता रतनलाल बाफना यांनी जळगावात येण्याची विनंती केली. त्यानंतर मुनीश्री चोपडा येथे आले व तेथून त्यांचा नियोजित दौरा दुसरीकडे होता. त्या वेळी पुन्हा रतनलाल बाफना व सकल जैन संघाचे संघपती दलुभाऊ जैन यांनी चोपडा येथे जाऊन मुनीश्रींना जळगावात येण्याचा आग्रह केला. त्या वेळी आपल्या नियोजित दौऱ्यात बदल करीत मुनीश्री जळगावात आले व तब्बल आठ दिवस येथे राहिल्याचे रतनलाल बाफना यांनी सांगितले.
प्रवचनातून दिले अनोखे संदेश
केवळ धर्म व तत्वज्ञान यावर भाष्य न करता विज्ञान व वास्तविकतेचे दर्शन आपल्या प्रवचनातून घडविणाºया तरुणसागरजी महाराज यांनी जळगावातही त्याचीच प्रचीती दिली. आठ दिवस जी.एस. मैदानावर त्यांचे प्रवचन झाले. यामध्ये त्यांनी भगवान महावीर स्वामी यांचा संदेश जनमाणसात पोहचवून ‘डोली सजा के रखना’, ‘बेटी बिदाई’ या विषयावर प्रवचन दिले. यात ‘डोली सजा के रखना’ या विषयामध्ये त्यांनी नववधू कशी असावी सांगत बेटी बिदाईतून मुलींबाबत अनोखे प्रवचन केले होते. त्यातून शहरवासीयांना मोठी प्रेरणा मिळाल्याचे दलुभाऊ जैन यांनी सांगत भर पावसातही येण्यास मुनीश्री यायला तयार असायचे, अशा आठवणी जागविल्या.
गोशाळेला दिले ‘अहिंसा तीर्थ’ नाव
तरुणसागरजी महाराज जळगावात आले असताना त्यांनी कुसुंबा परिसरात असलेल्या गोशाळेस भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी रतनलाल बाफना यांच्या गोसेवेच्या कार्याचे कौतूक करीत हे महान कार्य अहिंसेचाच संदेश देते, त्यामुळे या गोशाळेला ‘अहिंसा तीर्थ’ असे नाव देण्याचे सूचविले. त्या वेळी बाफना यांनी लगेच तसे नामकरणही केले. ही गोशाळा बघितली नसती तर माझी इच्छा अपूर्ण राहून गेली असती, असा उल्लेख त्यांनी केल्याचे रतनलाल बाफना यांनी आठवणी जागवितांना सांगितले.
प्लॅस्टिक पार्कची प्रेरणादायी भेट
राष्ट्र संत मुनिश्री तरुण सागरजी महाराज आणि प्रतिक सागरजी महाराज या मुनिश्रींच्या ‘भारत विहार’ दौºयादरम्यान ते जळगाव येथे आले असता जैन इरिगेशनच्या प्लॅस्टिक पार्क येथे त्यांचा पदस्पर्श झाला होता. या भेटीत त्यांनी एक रात्र मुक्कामही केला. त्यांनी सांगितलेल्या राष्ट्रप्रेम, शांती आणि सदाचाराचा मार्ग सर्वांना प्रेरणादायी ठरला. आमच्या परिवाराला त्यांच्या पवित्र सान्निध्याचा योग येणे म्हणजे मोठे भाग्यच ठरले, असे जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितले.
येणारे जाणारे थांबून ऐकायचे प्रवचन
मुनीश्रींच्या प्रवचनादरम्यान त्यांनी जैन समाजाव्यतिरिक्त दररोज इतर समाजातील मान्यवरांना व्यासपीठावर बोलावून प्रमुख अतिथींचा मान दिला. यामध्ये डॉ. अविनाश आचार्य, हरनारायण लाठी, अ‍ॅड. उज्ज्वल निकम या सारख्या दिग्गज मंडळींचा समावेश होता,अशी माहिती महावीर दिगंबर जीन चैत्यालय ट्रस्टचे अध्यक्ष राजेश जैन यांनी सांगितले. त्यांच्या प्रवचनास दररोज आठ ते १० हजार नागरिक उपस्थित असायचे. इतकेच नव्हे त्यांचे प्रवचन ऐकून येणारे जाणारेही थांबून त्यांच्या प्रवचनाचा लाभ घ्यायचे, अशी आठवणही राजेश जैन यांनी सांगितली.
प्रवचनाने केले शहरवासीयांना प्रभावीत
मुनीश्रींच्या प्रवचनाने जळगावात इतरही समाजाच्या मंडळींना प्रभावित केले होते, अशी आठवण तेरापंथ सभेचे अध्यक्ष मनोज सुराणा यांनी सांगितले.
जिल्हावासीयांना केले प्रभावित
तरुणसागरजी महाराज यांनी आपल्या प्रवचनाने केवळ जैन समाजच नाही तर जिल्हाभरातून जळगावात आलेल्या सर्वांनाच प्रभावीत केले होते. त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी दररोज गर्दी वाढतच गेली होती, अशी आठवण जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे अध्यक्ष भागचंद बेदमुथा यांनी सांगितले.

Web Title: inspiration to the residents of Tarunsagarji maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.