बोदवडमध्ये महिलांसाठी प्रेरणादायी ‘नंदाई’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 12:57 AM2020-03-08T00:57:12+5:302020-03-08T00:59:21+5:30
महिलांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात तसेच त्यांच्यात घराचा उंबरठा ओलांडून काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळावी, त्याचप्रमाणे आजच्या युगात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांपासून सुरक्षा मिळून त्यांना स्वयंसुरक्षेचे प्रशिक्षण मिळावे यासाठी नंदाई बहुउद्देशीय संस्था कार्यरत आहे.
गोपाळ व्यास ।
बोदवड, जि.जळगाव : तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात तसेच त्यांच्यात घराचा उंबरठा ओलांडून काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळावी, त्याचप्रमाणे आजच्या युगात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांपासून सुरक्षा मिळून त्यांना स्वयंसुरक्षेचे प्रशिक्षण मिळावे यासाठी बोदवड शहरात नंदाई बहुउद्देशीय संस्था कार्यरत आहे.
दोन वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना
दोन वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना वैशाली योगेश कुलकर्णी यांनी केली. त्यात त्यांनी सर्वप्रथम महिलांसाठी आरोग्य शिबिर घेतले. त्यात महिलांना शारीरीक कसरतीसह योग साधना, त्याचप्रमाणे त्यांना प्रतिकूल परिस्थितीत होणाºया घटनांपासून संरक्षण करण्यासाठी कराटे प्रशिक्षण दिले.
त्यांना ग्रामीण भागातील महिला व स्रियांना आज तांत्रिक युगात अग्रेसर राहण्यासाठी डिजिटल तसेच संगणकाचे प्राथमिक ज्ञान यावर भर दिला.
महिला आणि युवतींना मार्गदर्शन
प्राथमिक शाळांमध्ये महिला सबलीकरण, महिला बचत गट, महिलांवरील अत्याचार व युवतींना आरोग्य मार्गदर्शन, यासोबतच बचत गटांना गृहोद्योग व उद्योग प्रशिक्षण याबाबत सखोल मार्गदर्शन संस्थेकडून घेतले जातात.
आज घडीला संस्थेत ग्रामीण भागातील अडीचशे महिला शिवण प्रशिक्षण घेत स्वयंरोजगाराचे धडे गिरवत आहेत. ग्रामीण भागातील महिलांनी प्रशिक्षित होऊन स्वत:चा लढा उभारावा हीच प्रेरणा घेऊन कार्य करीत आहे. आजही अनेक माझ्या बहिणी कधी हुंड्यासाठी तर कधी विविध अत्याचाराला बळी पडतात. त्यातून त्यांना आत्मबल वाढविण्यासाठी लढण्यासाठी आपण ही संस्था सुरू केल्याचे त्या सांगतात.