शिवभोजन केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:17 AM2021-09-26T04:17:32+5:302021-09-26T04:17:32+5:30

जळगाव : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्राधान्य कुटूंब योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना प्राधान्याने शिधापत्रिका उपलब्ध करुन देण्यासाठी ...

Install CCTV cameras at Shivbhojan centers | शिवभोजन केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावा

शिवभोजन केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावा

Next

जळगाव : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्राधान्य कुटूंब योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना प्राधान्याने शिधापत्रिका उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजनबध्द कार्यक्रम राबवावा, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी दिले. शिवभोजन केंद्रांवरील कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, अशा सूचनादेखील भुजबळ यांनी दिल्या.

अजिंठा शासकीय विश्रामगृहात भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक बी.जी.जाधव, जिल्हा मार्केटींग अधिकारी एन. डी. मगरे, विभागीय आयुक्त कार्यालयातील तहसीलदार साहेबराव शिंदे, वैधमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक सी. डी. पालीवाल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

अफरातफर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

जिल्ह्यातील दिव्यांग, विधवा, परितक्त्या, भूमीहीन शेतमजूर, अल्प भूधारक शेतकरी, दुर्धर आजारग्रस्त, आदिवासी व्यक्ती, ज्यांना कुठलाही आधार नाही असे ६० वर्षावरील वृध्द तसेच दारिद्रय रेषेखालील नागरिकांचा अंत्योदय योजनेत समावेश करुन त्यांना या योजनेतंर्गत धान्याचा लाभ द्यावा. ज्या लाभार्थींनी गेल्या वर्षभरात धान्य घेतलेल नाही त्यांची यादी तयार करावी. तसेच रेशनच्या मालाची अफरातफर होत असल्याचे आढळून आल्यास दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा सूचनादेखील त्यांनी या वेळी दिल्या. तसेच गरजूंना धान्याचा लाभ देण्यासाठी धोरण आखावे, अशा सूचनादेखील त्यांनी यावेळी दिल्या.

गरज लक्षात घेऊन शिवभोजन केंद्र वाढवा

शिवभोजन केंद्रांना नियमितपणे भेट देऊन तेथील तपासणी करावी, गरजू नागरिकांची शिवभोजनची गरज लक्षात घेऊन केंद्र वाढविण्यात यावेत, प्रत्येक केंद्रासाठी इष्टांक एकसारखा राहील याची दक्षता घेण्याच्या सूचनाही भुजबळ यांनी यावेळी दिल्यात.

भरडधान्य नावनोंदणीस मुदतवाढीसाठी पाठपुरावा करणार

भरडधान्य केंद्रावर नावनोंदणीची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपत आहेत. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही मंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Install CCTV cameras at Shivbhojan centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.