आला रे आला... सकाळी ६.३५ पासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत करा बाप्पाची स्थापना

By अमित महाबळ | Published: August 30, 2022 09:52 PM2022-08-30T21:52:32+5:302022-08-30T21:53:33+5:30

कोरोनाच्या महामारीनंतर यंदा प्रथमच भीतीमुक्त वातावरणात, मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा होताना दिसत आहे

Install Ganpati Bappa from 6.35 am to 1.30 pm in every house | आला रे आला... सकाळी ६.३५ पासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत करा बाप्पाची स्थापना

आला रे आला... सकाळी ६.३५ पासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत करा बाप्पाची स्थापना

Next

जळगाव : सर्वांचा लाडका, गणपती बाप्पाचे घरोघरी जल्लोषात व थाटात आगमन होणार आहे. बुधवारी, श्रींच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा केली जाईल. सकाळी ६.३५ पासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत घरगुती गणपतींसाठी प्राणप्रतिष्ठा करण्याचा मुहूर्त आहे. यानंतरचे पुढील दहा दिवस सगळीकडे उत्सवी वातावरण असणार आहे.

कोरोनाच्या महामारीनंतर यंदा प्रथमच भीतीमुक्त वातावरणात, मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा होताना दिसत आहे. सार्वजनिक मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. त्यांचे देखावे तयार होत आले आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि धार्मिक देखाव्यांवर मंडळांचा भर आहे. 

असा आहे मुहूर्त
पंचांगानुसार घरगुती गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सकाळी ६.३५ पासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत शास्त्रशुद्ध मुहूर्त आहे. माध्यान्ह व सायंकाळ प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी वर्ज्य आहे. यामुळे या काळात स्थापना करू नये, अशी माहिती पुरोहित सुबोध तारे यांनी दिली.

उंचीची अशीही स्पर्धा 
उंच गणेश मूर्तींचे यंदा विशेष आकर्षण राहील. २२ फूट वा त्यापेक्षा अधिक उंचीच्या मूर्ती जळगावकरांना बघायला मिळणार आहेत. काही मंडळांनी आपल्या मूर्ती काँग्रेस भवन प्रांगणातील मोकळ्या जागेत आणून ठेवलेल्या आहेत. बुधवारी, मिरवणुकीने त्या मंडळाच्या मंडपात आणल्या जातील. मंडळांची स्वत:च्या कार्यकर्त्यांची ढोल-ताशा पथके सज्ज झालेली आहेत. यामध्ये तरुण-तरुणींसह बाल वादकांचाही समावेश असणार आहे.

गणेश मूर्तीचे दर वाढले
मूर्तींच्या किंमतीत यंदा २० ते ३० टक्के दरवाढ झाली आहे. शाडू मातीच्या मूर्तींना अधिक मागणी आहे. याशिवाय पीओपी व तुरटी प्रकारातील मूर्तींना प्रतिसाद आहे. गणेश कॉलनी चौक, महाबळ कॉलनी चौक, टॉवर चौक, आकाशवाणी चौक गणेशभक्तांच्या गर्दीने फुलले होते. 

आरास साहित्याची विक्री
सजावट व आरास साहित्याला मागणी आहे. लायटिंग, विविधरंगी दिवे मोठ्या प्रमाणात विकले गेले. तयार मखर नेण्याकडे अनेकांचा कल होता. २० रुपयांत गणपतीची पूजा व लाल रंगाचे वस्त्र मिळत होते. पुढचे दहा दिवस फुलांचा बाजार तेजीत राहणार आहे. प्रामुख्याने झेंडू, शेवंती व गुलाबाच्या फुलांना मागणी राहील.

प्रसाद साहित्याची खरेदी
नारळ, खोबरा चुरा, साखर आदी प्रसाद साहित्याला मोठी मागणी आहे. गणपतीच्या पुजेसाठी पत्रींसह केळी, सफरचंद, चिकू विकायला आले आहेत. मिठाई व किराणा दुकानात विविध स्वादातील मोदक विक्रीला आहेत.

नियोजनामुळे एक रस्ता खुला
प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे टॉवर चौक ते प्रकाश मेडिकलपर्यंतचा एका रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होता. शहर पोलीस स्टेशनच्या समोर, तसेच दुभाजकावर यावर्षी स्टॉल लावण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे रस्त्याच्या दोनही बाजूने होणारी गर्दी टळली आहे. खरेदीसाठी येणाऱ्यांना वाहने टॉवर चौकातच लावावी लागत आहेत.

जि.प.मध्ये स्थापना
सात वर्षांच्या कालखंडानंतर जि.प.मध्ये गणरायाची स्थापना होणार आहे. पाच दिवसांचा गणपती राहणार असून, विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी भंडारा आयोजित करण्यात आला आहे.

Web Title: Install Ganpati Bappa from 6.35 am to 1.30 pm in every house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.