घोटाळे गाजण्यापेक्षा ‘वाजले’ पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 07:24 PM2018-09-08T19:24:09+5:302018-09-08T19:24:33+5:30
हितेंद्र काळुंखे
जळगाव : जिल्हा परिषदेत अनेक घोटाळे गाजले आणि लागोपाठ गाजतही आहेत. मात्र एखादा फुगा फुगावा आणि पंक्चर होवून त्यातील हवा निघून जावी, याप्रमाणेच प्रत्येक घोटाळ्यांचे होत आहे. शालेय पोषण आहार, गणवेश घोटाळा, अपंग युनीट घोळ अशी अनेक प्रकरणे पुढे आली मात्र काळाच्या ओघात मागे पडली. नुकतेच बुरशीयुक्त शेवयांचे प्रकरण गाजले. सर्वसाधारण सभेत संबधितांवर गुन्हा दाखल करण्याचा ठरावही झाला मात्र तांत्रिक बाबींमुळे तो दाखल करता आला नाही.आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा करण्यात आली. बुरशीयुक्त शेवयांच्या अहवालही आला. आश्चर्य वाटावे असा हा अहवाल होता. ज्या शेवया अगदी बुवरशीयुक्त होत्या त्या शेवया खाण्यायोग्य असल्याचा अहवाल आला, यामुळे संबंधितावर कारवाई करण्याचा प्रश्नच नाही, असा अभिप्राय आयुक्त कार्यालयाने दिला. ज्या बुरशी युक्त शेवया पाहिल्यावर कोणीही सांगेल की त्या खाण्यास घातक आहेत, त्या शेवयांचा अहवाल असा आलाच कसा? या विचाराने सारेच हैराण झाले.. हतबल झाले. एखादे गाढव सर्वांनी पाहिले आणि मात्र त्याबाबत घोडा असल्याचा अभिप्राय यावा, असाच हा प्रकार घडला. मात्र पुन्हा दुसरीकडे शहानिशा करण्याची सोयही राहिली नाही. कारण सर्व नमुनेच गायब झाले आहे. हे नमुने गायब कसे झाले? याचा जाब जि. प. सदस्यांनी विचारुन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. परंतु अधिकारी म्हणतात की मला नमुनेच मिळाले नाही. आता पुन्हा पुरावे आणि तांत्रिक बाबींचा आधार घेतला जाईल आणि निष्कर्ष झिरो येईल असाच आपर्यंतचा अनुभव आहे. हे प्रकरण संपत नाही तोच असोदा येथे परवाच तीन मुलांना शेवया खाल्ल्याने विषबाधा झाली. सुदैवाने गंभीर प्रकार घडला नाही. या घटनेनंतर जि.प. सदस्या पल्लवी देशमुख यांचे पती रवी देशमुख यांनी बालविकास अधिकारी आर. आर. तडवी यांना जाब विचारल्यावर त्यांनी शेवयांचे पाकिटे जमा करण्याच्या सूचना दिल्या परंतु असा खराब माल येतच राहिला आणि अहवाल आश्चर्यकारक अर्थात चुकीचे येत असेल तर चलाखी कोठे होते? हे पाहणे गरजेचे असून एखादे प्रकरण गाजण्यापेक्षा संबंधित दोषींना कायद्याच्या दणक्याने कसे वाजवले जाईल, यादृष्टीनेच प्रयत्न होणे गरजेचे आहे. तरच असे घोटाळे नियंत्रणात येतील.