आरोग्य पथकाला २४ तास स्टेशनवर राहण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:15 AM2020-12-24T04:15:47+5:302020-12-24T04:15:47+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गुजरात, दिल्ली, गोवा व राजस्थानमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची गन मशीनने तापमान व इतर ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गुजरात, दिल्ली, गोवा व राजस्थानमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची गन मशीनने तापमान व इतर तपासणी करूनच स्टेशनबाहेर सोडण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार जळगाव मनपा प्रशासनातर्फे स्टेशनावर आरोग्य पथक नियुक्त करण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यात रात्री नऊ ते नऊ वाजेच्या सुमारास हे आरोग्य पथकाचे कर्मचारी जागेवर नसल्यामुळे विनातपासणीच प्रवासी घराकडे गेले होते. तसेच या ठिकाणी तिकीट तपासणीसाठी असलेल्या एका तिकीट निरीक्षकानेही आरोग्य पथकाबाबत आपल्या काहीही माहिती नसल्याचे सांगत, दुर्लक्ष केले होते. या हलगर्जीपणाबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर मनपा व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे.
इन्फो:
अन्यथा, यापुढे कर्मचाऱ्यांवर कारवाई
या प्रकाराबाबत मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राम रावलानी यांनी आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांना चांगलेच खडसावून, आरोग्य पथकाला २४ तास स्टेशनवर हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच तपासणीसाठी दोन आरोग्य कर्मचाऱ्यांची जादा नियुक्ती केली असल्याचे रावलानी यांनी सांगितले. तर रेल्वेचे सीनिअर डीसीएम युवराज पाटील यांनीही तपासणीसाठी दोन जादा तिकीट निरीक्षकांची नियुक्ती केली असून, पुन्हा असा प्रकार घडू नये, याबाबत तिकीट निरीक्षकांना कडक सूचना केल्या आहेत.