तोरणमाळला साकारणार आंतरराष्टÑीय दर्जाची निवासी शाळा
By Admin | Published: February 12, 2017 12:52 AM2017-02-12T00:52:33+5:302017-02-12T00:52:33+5:30
तोरणमाळ, ता.धडगाव केंद्रातील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासनाने त्या ठिकाणी आंतरराष्टÑीय दर्जाची निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नंदुरबार : राज्यात सर्वाधिक विद्यार्थी गळतीचे प्रमाण असलेल्या आणि भौगोलिक दृष्ट्या अतिदुर्गम भागात विस्तारलेल्या तोरणमाळ, ता.धडगाव केंद्रातील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासनाने त्या ठिकाणी आंतरराष्टÑीय दर्जाची निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळेच्या बांधकामासाठी ४१ कोटी ७० लाख रुपयांचा निधीची तरतूदही करण्यात आली आहे.
सातपुड्यातील तोरणमाळ हे राज्यातील सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. हा भाग पूर्णत: सातपुड्याच्या डोंगरदºयात विस्तारल्याने या भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी या भागात भेटी दिल्यानंतर या भागातील शाळांचे विदारक स्वरूप समोर आले.
या पार्श्वभूमीवर तोरणमाळ केंद्रात येणाºया शाळांचे सर्वेक्षण झाल्यानंतर या केंद्रात सर्वाधिक म्हणजे ८५३ विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास आले. हे प्रमाण राज्यात सर्वाधिक असल्याने शिक्षण विभागाने त्यावर गंभीरपणे चिंतन करून या भागातील गळती रोखण्यासाठी या ठिकाणी निवासी शाळा सुरू करण्याची संकल्पना पुढे आली.
प्रधान सचिव नंदकुमार, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घन:शाम मंगळे, तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांनी या ठिकाणी आंतरराष्टÑीय दर्जाची निवासी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला. त्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
तोरणमाळ येथे प्रस्तावित असलेली ही शाळा १६०० विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे. त्यात ८०० विद्यार्थी व ८०० विद्यार्थिनींचा समावेश आहे. या ठिकाणी ६१ हजार ६०४.५२ चौरस फूट क्षेत्रफळात शाळेच्या इमारतीचे बांधकाम होणार आहे. त्यासाठी आठ कोटी ८० लाख ५४ हजार रुपयांचा खर्च तसेच विद्यार्थ्यांसाठी फर्निचरकरिता ३२ लाख असे एकूण नऊ कोटी १२ लाख ५४ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
तसेच मुलांकरिता व मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृहे बांधण्यात येणार असून त्यासाठी ३२ कोटी ५८ लाख १८ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. असे एकूण या शाळेकरिता ४१ कोटी ७० लाख ७२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
तोरणमाळ येथील या प्रस्तावित शाळेसाठी साधारणत: पाच हेक्टर जागेची पहाणीही प्रशासनाने केली असून ही जागा मिळविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. या शाळेत जिल्हा परिषदेतील निवडक होतकरू शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना आंतरराष्टÑीय स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लवकरच शाळेच्या कामाला सुरुवात करण्याबाबत प्रशासनाची तयारी सुरू आहे.
राज्यात १०० शाळांचा प्रस्ताव
राज्यात १०० आंतरराष्टÑीय दर्जाच्या निवासी शाळा सुरू करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव आहे. त्यातील प्रायोगिक तत्त्वावर तोरणमाळ केंद्राची निवड करण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक गळतीचे प्रमाण या केंद्रात असल्याने या शाळेला प्राधान्य देण्यात आले आहे. येथील प्रयोगानंतर राज्यात इतर ठिकाणी शाळा सुरू होतील. सध्याची स्थिती पहाता या शैक्षणिक वर्षात ही शाळा सुरू होणे शक्य नाही. कारण तोरणमाळला भाड्याच्या इमारती मिळणेही अवघड असल्याने शाळा इमारतीचे बांधकाम तत्काळ होणे अपेक्षित आहे.