चौकाचौकात बंदोबस्त; रस्त्यावर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:10 AM2021-03-29T04:10:47+5:302021-03-29T04:10:47+5:30
जळगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात तीन दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. रविवारी त्याचा पहिला दिवस होता. शहरात ...
जळगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात तीन दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. रविवारी त्याचा पहिला दिवस होता. शहरात प्रत्येक चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त होता, तर काही पोलीस कर्मचारी दुचाकी व चारचाकीने पेट्रोलिंग करताना दिसून आले. गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या लॉकडाऊनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
शहरात सकाळी, दुपारी व संध्याकाळी फेरफटका मारला असता टाॅवर चौक, गोविंदा रिक्षा थांबा, भीलपुरा चौक, चौबे शाळा, प्रजापतनगर, अजिंठा चौक, इच्छा देवी चौकात पोलिसांचा बंदोबस्त होता. रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी थांबवून पोलिसांकडून चौकशी केली जात होती. विनाकारण व अनावश्यक फिरणाऱ्यांवर कलम १८८ अन्वये कारवाई केली जात होती. यावेळी प्रथमच कारवाईचे स्वरूप सौम्य होते तर दंडुक्याचा वापर कुठेही झाला नाही, हे विशेष !
दोन हजार होमगार्ड तैनात
या तीन दिवसांच्या लाॅकडाऊन काळात दोन हजार होमगार्ड बाहेरून मागविण्यात आले आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशन व नियंत्रण कक्षात त्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय पोलीस ठाण्याचा बंदोबस्त त्यांच्या हद्दीत लावण्यात आला आहे. बीट मार्शल व आरसीपी प्लाटून यांच्या मार्फत गस्त घातली जात असल्याची माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी दिली. यावेळी लोकांनीच आदेशाचे पालन केल्याने कारवाई अगदी नगण्यच होती, असेही त्यांनी सांगितले.
खासगी वाहनांचा वापर
शहर व जिल्ह्यात एसटी बसप्रमाणेच खासगी चारचाकी वाहने धावताना दिसून आली. सकाळच्या सुमारास वाहनांची संख्या अधिक होती तर दुपारी अगदी नगण्य वाहने रस्त्यावर दिसून आली. महामार्गावर खोटेनगर, इच्छादेवी, अजिंठा चौक व कालंका माता चौकात या वाहनांची तपासणी केली जात होती.