मुलाखत : ग्रंथपालांच्या पुढाकाराने वाचन संस्कृती आजही टिकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 01:30 PM2018-12-10T13:30:00+5:302018-12-10T13:30:24+5:30
महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अॅण्ड कॉलेज लायब्ररियनचे अध्यक्ष डॉ. मोहन खेरडे यांचा विश्वास
जळगाव : वाचन संस्कृती लोप पावत आहे, असे विधान नेहमी केले जाते. मात्र तसे नसून वाचनाची गोडी आजही कायम आहे. ही वाचन संस्कृती टिकविण्यासाठी ग्रंथपालांचा सदैव पुढाकार राहिला असून त्यामुळे प्रत्येकाला वाचनाची आवड वाढत आहे, असे स्पष्ट मत महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अॅण्ड कॉलेज लायब्ररियनचे(मुक्ला) अध्यक्ष डॉ. मोहन खेरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
जळगावात ‘ग्रंथालय आणि माहितीशास्त्र’ या विषयावर दोन दिवसाय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी डॉ. खेरडे हे जळगावात आले होते. त्या प्रसंगी त्यांच्याशी झालेला हा संवाद...
वाचनाची आवड आजही कायम असून प्रत्येक जण वाचन करीत आहे. आज केवळ वाचनाचे माध्यम बदलले आहे. पूर्वी केवळ छापील साहित्याचे वाचन होत असे. आता त्या सोबतच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातूनही (मोबाईल, संगणक) वाचन केले जात आहे. त्यामुळे वाचन संस्कृती आजही अबाधीत आह, असे खरडे यांनी सांगितले.
नवीन विद्यापीठ कायद्याच्या मसुद्यासाठी ‘मुक्ला’ने सूचविलेल्या सुधारणांचा त्यात अंतर्भाव करण्यात आला आहे. यात काही मागण्या अजूनही असून त्यादेखील मान्य होतील, असा विश्वास डॉ. खरडे यांनी व्यक्त केला. महाविद्यालयांमधील ग्रंथालयांना ‘नॉलेज रिसर्च सेंटर’ म्हणून संबोधावे, ही मागणी मान्य व्हावी, अशी अपेक्षाही डॉ. खरडे यांनी व्यक्त केली.
...तर ग्रंथालयांचा अधिक विकास
पीएचडीसाठी मार्गदर्शक म्हणून परवानगी अद्यापही दिली जात नाही. त्यामुळे ग्रंथालयांमध्ये संशोधनास बाधा येत आहे. त्यासाठी ही परवानगी मिळावी व त्यातून अभ्यासकास अधिक माहिती मिळून ग्रंथालयांचा अधिक विकास होईल, असेही मत डॉ. खेरडे यांनी व्यक्त केले.
आज अनेक ग्रंथ, वेगवेगळ््या प्रकारातील, भाषेतील साहित्य आपल्या हातातील मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी अनेक अॅप्स्देखील असल्याने तरुणाई त्यांचा वापर करीत आहे. यातून ई-लायब्ररीला प्रतिसाद वाढतच असल्याचे आहे.
सोशल मीडिया वाचनाचे सक्षम माध्यम
वाचनामध्ये सोशल मीडिया वाचनाचे एक सक्षम माध्यम म्हणून पुढे येत आहे. सोशल मीडियावरही येणारी माहिती प्रत्येक वर्गातील व्यक्ती आवडीने वाचन करतो. सोशल मीडियाचा दुरुपयोग होत असेल मात्र याच सोशल मीडियावर अनेक चांगले संदेशही असतात. धार्मिक, सामाजिक माहितीचे अदान-प्रदान होते. त्यामुळे वाचनाचे ते एक चांगले माध्यम आहे, असे डॉ. खरडे म्हणाले.