वाघूर धरणाच्या बॅकवॉटरमधून अवैध उपसा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 01:10 AM2018-10-06T01:10:29+5:302018-10-06T01:13:23+5:30
जामनेर शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या वाघूर धरणाच्या बॅक वॉटरमधून वीज पंप लावून सर्रास पाण्याचा दिवसाढवळ्या उपसा सुरू असून प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष झाल्याने पाणी टंचाईची भिती कायम आहे.
जामनेर : शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या वाघूर धरणातील पाण्याची स्थिती लक्षात घेत पालिकेने पाणी कपातीला सुरुवात केलेली असली तरी धरणातील बॅक वॉटरमधून वीज पंपाद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा सुरुच असल्याचे दिसत आहे. पाटबंधारे विभाग व महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
यंदा सरासरीच्या केवळ ५५ टक्के इतकाच पाऊस झाला. परिणामी तालुक्यातील धरण, पाझर तलाव, पाटबंधारे प्रकल्प अपूर्ण भरलेले आहेत. कांग, वाघुर व सूर या नद्यांना मोठे पूर न गेल्याने वाघुर धरणातील पाणी साठ्यात अपेक्षीत वाढ झालेली नाही. सद्यस्थितीत एकमेव कांग प्रकल्पात समाधानकारक पाणी साठा असून तोंडापुर मध्यम प्रकल्पात फक्त २० टक्के साठा आहे. जुन अखेर पर्यंत तालुक्यात दहा गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरु होता. आॅगष्टमध्ये झालेल्या पावसाने टँकरची संख्या कमी झाली. सध्या टँकर नसले तरी पुढील महिन्यात ग्रामिण भागात पाणी टंचाईची तिव्रता वाढू शकते.
तालुक्यातील हिवरखेडे बुद्रुक, खादगांव, हिंगणे, गंगापुरी, गारखेडे, शिंगाईत, मांडवे, चिंचखेडे, नेरी आदी बुडीत क्षेत्रातील पाण्ी साठ्यातून मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे. संभाव्य टंचाई स्थिती लक्षात घेवुन संबंधीत विभागाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.