मॉर्निग वॉक करताना पकडली अवैध वाळूची वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:32 PM2017-08-01T12:32:43+5:302017-08-01T12:35:39+5:30
तहसीलदारांची कारवाई : तीन जणांविरुद्ध दोन पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल ; वाळूसह दोन ट्रॅक्टर जप्त
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 1 - मॉर्निग वॉक करीत असताना तहसीलदार अमोल निकम यांनी जिल्हाधिका:यांच्या निवासस्थान परिसरातील चर्च व मेहरुण परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर सोमवारी सकाळी पकडले. वाळूसह वाहने जप्त करण्यात आली असून दोन्ही प्रकरणात रामानंद नगर व एमआयडीसी पोलीस स्टेशनला तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार अमोल निकम हे सोमवारी सकाळी साडे सहा वाजता मॉर्निग वॉक करीत होते. नागङिारी शिवारातून मेहरुणमध्ये विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी हे ट्रॅक्टर अडवून चालकाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव राजू शालिक ठाकरे (रा.मोहाडी, ता.जळगाव) असे सांगितले. भाडय़ाचे ट्रॅक्टर घेऊन वाळू वाहतूक करीत असल्याचे त्याने चौकशीत सांगितले. निकम यांनी हे ट्रॅक्टर एमआयडीसी पोलीस स्टेशनला नेले. तेथे चिंचोलीचे तलाठी वनराज पाटील यांच्या फिर्यादीवरुन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, तहसीलदार निकम यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन पकडण्याचा धडाका लावल्याने खळबळ उडाली आहे.