बेवारस म्हणून अंत्यंसस्कार होण्यापूर्वी वारसाचा लागला शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 10:18 PM2019-11-26T22:18:03+5:302019-11-26T22:18:19+5:30
जननायक फांऊडेशनचा पुढाकार ;पित्याचा मृतदेह पाहून मुलाने फोडला हंबरडा
जळगाव : तब्बल २० दिवसापासून घरातून गायब झालेल्या गुलशनखा मिरखा पठाण (५५, रा.कसाली मोहल्ला, अमळनेर) यांचा मृतदेह मंगळवारी निमखेडी शिवारात आढळून आला. त्यांची ओळख पटत नसल्याने बेवारस म्हणून त्याची जिल्हा रुग्णालयात नोंद घेण्यात आली. सरकारी नियमानुसार कालावधी पूर्ण झाल्यानंतर बेवारस म्हणूनच अंत्यविधी होणार होता, मात्र जननायक फांऊडेशनने पुढाकार घेऊन वारसांचा शोध घेतला, आणि पठाण यांचा अखेरचा चेहरा मुलाला पाहता आला...पित्याचा मृतदेह पाहून मुलाने एकच हंबरडा फोडला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निमखेडी शिवारात कांताई नेत्रालयाच्यासमोर गटारीत मंगळवारी सकाळी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी ही माहिती तालुका पोलिसांना कळविली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. ओळख स्पष्ट न झाल्याने तेथे बेवारस म्हणून नोंद घेण्यात आली. त्याचवेळी जननायक फांऊडेशनचे फरीद खान यांनी त्यांचा फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. सायंकाळी अमळनेर येथील नुरेखा पठाण यांनी खान यांच्याशी संपर्क साधून मृतदेहाबाबत माहिती घेतली. मुलगा तसेच अमळनेरचे नगरसेवक फिरोज उस्मानखा पठाण, मुशीर बयास व इतर नातेवाईकांनी तातडीने जिल्हा रुग्णालय गाठले. मृतदेह वडीलांचा असल्याचे पाहून त्यांनी हंबरडा फोडला.
अन्न, पाण्याविना मृत्यू झाल्याचा संशय
दरम्यान, जननायक फांऊडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान व सहकाऱ्यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देत रुग्णालयातील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह मुलाच्या ताब्यात दिला. फांऊडेशनच्या कार्यकर्त्यांनी ओळख पटविण्यासाठी पुढाकार घेतला नसता तर कुटुंब जिल्ह्यात असतानाही पठाण यांच्यावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार झाले असते. दरम्यान, पठाण हे ५ नोव्हेंबरपासून घरातून बेपत्ता होते. काही अंशी ते मनोरुग्ण होते. पण ते घरी परत येत होते. त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. अन्न, पाणी विना त्यांचा मृत्यू झाला असावा असा संशय आहे.