दोन वर्षानंतर होणार 'आविष्कार' संशोधन स्पर्धा; १८ ऑक्टोंबरला जिल्हास्तरीय स्पर्धा, स्वतंत्र पोर्टलची निर्मिती....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2022 03:59 PM2022-09-10T15:59:55+5:302022-09-10T16:00:08+5:30
विद्यार्थीदशेत संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी राज्यपालांनी दरवर्षी विद्यापीठ स्तरावर व त्यानंतर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अविष्कार संशोधन स्पर्धा सुरू केलेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने दि. १८ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून ही संशोधन स्पर्धा होवू शकली नव्हती.
विद्यार्थीदशेत संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी राज्यपालांनी दरवर्षी विद्यापीठ स्तरावर व त्यानंतर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अविष्कार संशोधन स्पर्धा सुरू केलेली आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने यंदा १८ ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी जळगाव,धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांसाठी त्या त्या जिल्ह्यात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी विद्यापीठातील प्रशाळांसाठी ही संशोधन स्पर्धा होईल. जिल्हा स्तरावरील अविष्कार स्पर्धा झाल्यांनतर त्यातील विजेत्यांची स्पर्धा ११ व १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
विषय निहाय सहा गट...
या स्पर्धेत विषय निहाय सहा गट करण्यात आले आहेत. त्यामध्ये पहिल्या गटात सामाजिकशास्त्र, शिक्षण, भाषा, मानव्यविद्या, ललित कला, दुसऱ्या गटात वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी, तिसऱ्या गटात विज्ञान ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैवशास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र, गृह आणि संगणशास्त्र, चौथ्या गटात कृषी आणि पशुसंवर्धन, पाचव्या गटात. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, व सहाव्या गटात औषधिनिर्माणशास्त्र यांचा समोवश आहे. ही स्पर्धा पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तरपदवी आणि शिक्षक या चार संवर्गात होणार आहे.
१५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले...
जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेचे संयोजकत्व स्विकारण्यासाठी महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. १५ सप्टेंबर पर्यंत महाविद्यालयांनी हे प्रस्ताव सादर करावयाचे आहेत.
८ ऑक्टोंबरपर्यंत नाव नोंदणी करावी लागणार
या स्पर्धेसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अविष्कार या नावाने स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवर स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १० सप्टेंबरपासून लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. ८ ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थ्यांना नाव नोंदणी व शुल्क भरता येईल, अशी माहिती स्पर्धेचे समन्वयक व संगणकशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. सतीष कोल्हे, पदार्थ विज्ञान विभागाप्रमुख प्रा. जयदीप साळी व विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा. सुनील कुलकर्णी यांनी केले आहे.