एमआयडीसीमध्ये तपासणीत आढळले नऊजण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:15 AM2021-04-24T04:15:37+5:302021-04-24T04:15:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरातील उद्योजकांसह तेथे काम करणारे कामगार, मजूर यांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरातील उद्योजकांसह तेथे काम करणारे कामगार, मजूर यांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी जिंदा भवन येथे मोफत ॲंटिजन तपासणी केली जात असून, या ठिकाणी नऊ जण बाधित आढळून आले. तीन दिवसात या ठिकाणी ८७० जणांची तपासणी करण्यात आली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, महानगरपालिका, सर्व औद्योगिक संघटना आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने एमआयडीसी येथील जिंदा भवन येथे २१ एप्रिल पासूनअँटिजन तपासणी केंद्र सुरु करण्यात आले.
आतापर्यंत या ठिकाणी ८७० जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये पहिल्या दिवशी एकही जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. त्यानंतर २२ एप्रिल रोजी झालेल्या ३९९ जणांच्या तपासणीतून पाच जण बाधित, तर २३ एप्रिल रोजी ३०५ जणांच्या तपासणीतून चार जण बाधित आढळून आले.
बाधित आढळून आल्यानंतर त्यांना डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जात असून, तसा अहवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे पाठविला जात आहे. तेथून रुग्णालयाच्या वतीने संबंधित बाधितांशी संपर्क साधला जात आहे. कामगारांची पूर्ण तपासणी होईपर्यंत हे केंद्र सुरू राहणार असून, भविष्यात या ठिकाणी लसीकरण केंद्रदेखील सुरू करण्याचा मानस असल्याचे इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सचिव विनोद बियाणी यांनी सांगितले.
या केंद्रात तंत्रज्ञ दिनेश तेजी, राहुल पाटील हे सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सेवा देत आहे. तसेच रविवारीदेखील ही सेवा सुरू राहणार आहे. या तपासणी केंद्रासाठी औद्योगिक संघटनेचे समीर साने, समीर चौधरी, संतोष इंगळे, महेश पाटील, तुषार पाटील, रवी फालक, योगेश इंगळे, लोकेश मराठे यांचे सहकार्य लाभत आहे.