खासगी बाजार समित्यांची तपासणी पूर्ण, अहवालात दडलयं काय? सोमवारी अहवाल सादर
By सुनील पाटील | Published: April 15, 2023 03:07 PM2023-04-15T15:07:48+5:302023-04-15T15:08:52+5:30
‘सहकार’कडून झाली चौकशी
सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या खासगी बाजार समितीची सहकार विभागाने दोन दिवसापूर्वी तपासणी केली असून चौकशी पूर्ण झालेली आहे. त्यात नेमका काय दोष आढळला किंवा नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. सोमवारी आपल्याकडे अहवाल येईल, तेव्हा पडताळणी करुन हा अहवाल पणन संचालक (पुणे) यांच्याकडे पाठविला जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी ‘लोकमत’ ला दिली.
जळगाव तालुक्यातील आव्हाणे व धरणगाव येथील भोद खुर्द शिवारातील खासगी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांच्या मालकीची आव्हाणे शिवारातील लक्ष्मी कृषी उत्पन्न बाजार समिती व धरणगाव येथील नीलेश चौधरी यांच्या मालकीच्या बाजार समितीच्या जागांची पणन संचालकांच्या आदेशाने सहकार विभागाच्या दोन पथकांनी गुरुवारी तपासणी केली होती. या दोन्ही बाजार समित्या खासगी मालकीच्या आहेत. पाळधी, ता.धरणगाव येथील प्रशांत नारायण झंवर यांनी १० एप्रिल रोजी पणन संचालक (पुणे) यांच्याकडे दोन स्वतंत्र तक्रारी केल्या होत्या.त्याची दखल घेऊन अचानकपणे या दोन्ही बाजार समितींची तपासणी करण्यात आली. दोन्ही ठिकाणाहून पथकाने कागदपत्रे ताब्यात घेतली असून अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सोमवारी जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांच्याकडे सादर होईल. त्यानंतर बिडवई आपल्या शिफारशीने तो पुणे पणन संचालकांकडे सादर करतील. या अहवालात नेमकं काय दडलयं हे अजून तरी स्पष्ट झालेले नाही. आव्हाणे येथील जागेची विशाल ठाकूर तर भोद येथील जागेची महेंद्र गाडे यांच्या नेतृत्वात तपासणी करण्यात आली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"