जीएमसीत तीन विभागांत तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:16 AM2021-04-04T04:16:52+5:302021-04-04T04:16:52+5:30
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या मान्यतेसाठी त्रिस्तरीय समितीने शनिवारी विविध पातळ्यांवर तपासणी केली. ...
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या मान्यतेसाठी त्रिस्तरीय समितीने शनिवारी विविध पातळ्यांवर तपासणी केली. जनऔषध वैद्यकशास्त्र, विकृतीशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र विभागात ही पाहणी करण्यात आली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही तपासणी सुरू होती. हा अहवाल ही समिती विद्यापीठाला सादर करणार आहे.
जनऔषध वैद्यकशास्त्र, विकृतीशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र विभागात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिकविण्यासाठी मान्यताच्या निरीक्षणासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रत्येकी एक सदस्यीय समिती नेमली होती. यात जनऔषध वैद्यकशास्त्राकरिता ९ प्रवेश क्षमता, तर विकृतीशास्त्र विभागासाठी ७, शल्यचिकित्सा ७ प्रवेश क्षमता मान्य झाली आहे. सकाळी ९ वाजता या समितीने महाविद्यालयात पाहणी केली. जनऔषध वैद्यकशास्त्र विभागात समितीचे अध्यक्ष डॉ.दिलीप ढेकळे यांनी विभागाच्या प्रमुख डॉ.बिना कुरील यांची भेट घेऊन माहिती जाणून घेतली, तसेच अभ्यासक्रम मान्यतेसाठी चौकशी करून कागदपत्रांची तपासणी केली. यावेळी विभागातील डॉ.योगिता बावस्कर, डॉ.विलास मालकर, डॉ.जितेंद्र सुरवाडे, डॉ.डॅनियल साझी उपस्थित होते.
विकृतीशास्त्र विभागात समितीचे अध्यक्ष डॉ.अनघा चोपडे यांना विभाग प्रमुख डॉ.शैला पुराणिक यांनी विभागाविषयी माहिती सांगितली. या विभागात ७ विद्यार्थी प्रवेश क्षमतेला मान्यता मिळाली आहे. यावेळी विभागात डॉ.भारत घोडके, डॉ.मनोज पाटील, डॉ.प्रदीप माले, डॉ.अहिल्या धडस यावेळी उपस्थित होते.
शल्यचिकित्सा शास्त्र विभागात डॉ.शिवाजी साधुलवाड यांनी पाहणी केली. यावेळी विभाग प्रमुख डॉ.मारोती पोटे यांनी माहिती दिली. यावेळी डॉ.संगीता गावित, डॉ.प्रशांत देवरे आदी उपस्थित होते. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू होण्यासाठी मान्यतेच्या कामास्तव निरीक्षणाची कार्यवाही समितीने पूर्ण केली. नंतर राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थांचे निरीक्षण होईल. आगामी काळात परवानगी मिळाली, तर पुढील शैक्षणिक वर्षाला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू होतील.