‘नॅशनल मॉथ विक’ उपक्रमात वन्यजीव संरक्षण संस्थेचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:07+5:302021-07-05T04:12:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दहा वर्षांपासून आंतराष्ट्रीय स्तरावर साजरा होत असलेल्या ‘नॅशनल मॉथ विक’ (पतंग महोत्सव) ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या दहा वर्षांपासून आंतराष्ट्रीय स्तरावर साजरा होत असलेल्या ‘नॅशनल मॉथ विक’ (पतंग महोत्सव) मध्ये जिल्ह्यातील वन्यजीव संरक्षण संस्थेचे संशोधक देखील सहभागी होणार आहेत. १७ ते २५ जुलैदरम्यान हा महोत्सव ऑनलाईन पद्धतीने साजरा होणार आहे. या महोत्सवात देशभरातून २०० हून अधिक अभ्यासक, संशोधक तसेच विविध संस्था सहभागी होणार आहेत.
या महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय समन्वयक म्हणून जैवविविधता इंडियाचे संस्थापक विजय बर्वे हे काम करीत असून, २०१२ पासून विजय बर्वे यांच्या नेतृत्वात भारतात राष्ट्रीय पतंग सप्ताहाचे संयोजन होत आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेकडून जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यांत कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील अमन गुजर, बाळकृष्ण देवरे, जयेश पाटील, धीरज शेकोकारे, सागर निकुंभे, योगेश गालफाडे हे कार्यक्रमाची आखणी करीत आहेत, तर अभ्यासक राहुल सोनवणे, रवींद्र सोनवणे, कल्पेश तायडे, प्रसाद सोनवणे, गौरव शिंदे हे पतंगाच्या विविध प्रजातींच्या नोंदी ठेवणार आहेत.
का साजरा केला जातो पतंग सप्ताह?
दरवर्षी अनेक पर्यावरण प्रेमींकडून वेगवेगळे सप्ताह साजरे केले जातात. त्यानुसार जैविक साखळीत महत्त्वाचे स्थान असलेले गूढ अशा रंगरूपांचे पतंग मात्र फारसे लोकप्रिय नसल्याने सर्वसामान्य त्यांच्यापासून अलिप्तच असतात. जास्तीत जास्त लोकांना या सप्ताहात सामील करून माहिती देणे हे आमचे ध्येय आहे, असे विजय बर्वे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पतंग शोधण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार असून, रात्रीच्या वेळेस पांढऱ्या कापडावर लाईटने प्रकाश टाकून, याठिकाणी जमा होणाऱ्या पतंगाचा अभ्यास संशोधक करणार आहेत.