आयपीएल सट्टा प्रकरण, चोपडा येथील घनश्याम अग्रवाल मुख्य बुकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 12:47 PM2018-05-07T12:47:00+5:302018-05-07T12:47:00+5:30
रायगड पोलिसांकडून कसून चौकशी
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ७ - आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणारे व त्याचे सौदे एकमेकांना देणाऱ्यांची मोठी साखळी आहे. या साखळीत चोपडा येथील भाजपाचे नेते घनश्याम अग्रवाल हे मुख्य बुकी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
पुणे व रायगड स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी खालापूर पोलिसांच्या मदतीने ३ मे रोजी मुंबई-पुणे महामार्गावर लिला ईन या लॉजिंगवर धाड टाकली होती. त्यात पाच जणांना अटक केल्यानंतर त्यांनी पुण्यातील चार मोठ्या बुकींची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन घनश्याम अग्रवाल यांचे नाव समोर आले. त्यानुसार अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे.
असा घेतला जातो सट्टा
आंतरराष्टÑीय सामन्यांपेक्षा आयपीएलची वाढत जाणारी लोकप्रियता पाहता या सामन्यांवर सट्टा लावण्याचे प्रमाण वाढले आहे. काही वर्षांपूर्वी केवळ कोणता संघ जिंकेल किंवा किती धावा करेल यावरच सट्टा लावला जात होता. मात्र, व्टेंटी-व्टेंटी सामन्यांचे प्रमाण वाढल्यानंतर टॉस पासून तर सामन्याचा ‘मॅन आॅफ द मॅच’ वर देखील सट्टा लावला जात आहे.
सामना सुरु होण्याआधी संघाच्या अकरा खेळाडूंमध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश असेल यावर सट्टा लावला जातो. सामन्याचा टॉस कोणता संघ जिंकेल यावर बुकींच्या नजरा असतात, टॉस वर केवळ मोठे बुकीच सट्टा लावतात. मात्र टॉस झाल्यानंतर सामन्याचा सट्टा लावण्याचे प्रमाण वाढत असते. यासाठी बुकी आता आॅनलाईन व अॅपचा देखील वापर करत आहेत.
घनश्याम अग्रवाल याच्याकडे भाजप नेत्यांची ‘उठबस’
घनश्याम अग्रवाल हे भाजपाच्या केंद्रीय समितीचे माजी सदस्य आहे. जिल्ह्यातील असो की राज्यातील दिग्गज नेते चोपडा शहरात आले की अग्रवाल याच्या निवासस्थानी आवर्जून भेट देतात. चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था अग्रवाल याच्याकडून केली जाते.
पहिलीच कारवाई...आॅनलाईन सट्टा असो की क्रिकेटचा सट्टा किंवा नियमित सट्टा या व्यवसायात घनश्याम अग्रवाल मुख्य बुकी आहे. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून या व्यवसायत असतानाही भाजप नेत्यांशी जवळीक असल्याने अग्रवाल याच्यावर आजपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नव्हती. आता खालापूर पोलिसांनी केलेली ही पहिलीच कारवाई असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारी एक मोठी साखळी आहे. दोन टप्प्यात आरोपींना अटक झाली. पुण्यातील बुकीच्या चौकशीत घनश्याम अग्रवाल याचे नाव पुढे आले. अग्रवाल हा देखील दुसºया बुकीकडे आकडे देतो, त्यामुळे तो बुकी कोण, याची साखळी कशी आहे याची चौकशी सुरु आहे. -जमील शेख, पोलीस निरीक्षक, खालापूर, जि.रायगड