सिंचनच्या १२ कोटींच्या कामांना स्टे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 11:31 AM2019-08-02T11:31:30+5:302019-08-02T11:32:52+5:30
जि.प.स्थायी समिती सभेत ठराव : हायमास्टच्या कामांनाही थांबा
जळगाव : लघुसिंचन विभागाने या वर्षी दिलेल्या १२ कोटी रूपयांच्या कामांचे कार्यारंभ आदेश थांबवावेत, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला़ कार्यकारी अभियंता नाईक यांनी कोणालाही विश्वासात न घेता वैयक्तिक नियोजन केल्याचा ठपका या सभेत ठेवण्यात आला़ या मुद्यावरून नाईक यांना कार्यमुक्त करण्याच्या ठरावावर पुन्हा एकदा वादळी चर्चा झाली़ याकामांसाठी स्वतंत्र निधी आणून १८ कोटींच्या कामांचे स्वतंत्र नियोजन करावे, असे ठरविण्यात आले.
लघुसिंचन विभागाला जिल्हा नियोजन समितीकडून १८ कोटी रूपयांचे नियत्वे प्राप्त झाले होते़ यापैकी १२ कोटी रूपयांचे नियोजन कार्यकारी अभियंता आऱ के़ नाईक यांनी आधिच करून घेतले होते़ याबाबत अध्यक्षा उज्ज्वला पाटील, जलव्यवस्थापन समिती, कोणालाही माहिती देण्यात आली नव्हती, शिवाय दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य आवश्यक असताना नवीन कामे यात घेण्यात आल्याचा मुद्दा शिवसेना सदस्य नानाभाऊ महाजन उपस्थित केला़
ज्या कामांच्या आॅर्डर देण्यात आल्या आहेत, त्या कामांसाठी विशेष निधीची तरतूद करून १८ कोटी रूपयांचे स्वतंत्र नियोजन करावे, असे सभेत ठरविण्यात आले़
त्यानुसार १२ कोटींच्या कामांची चौकशी होऊन पुढील नियोजन ठरणार असल्याची माहिती महाजन यांनी दिली़
दरम्यान, समाज कल्याण विभागाचा अडीच कोटी निधी खर्च होत नसल्याचा तसेच अपंगाच्या योजना व्यवस्थित असाव्यात, शिक्षक पदोन्नत्या आदी विषय स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आले़
मंजुरी आधीच वर्कआॅर्डर
लघुसिंचन विभागाला प्राप्त नियतव्यय सर्वसाधारण सभेत १७ जून रोजी मंजुरी करण्यात आले होते़ मात्र, त्या आधीच ६ जून रोजी १२ कोटींच्या कामांचे कार्यारंभ आदेश कसे देण्यात आले, हा प्रश्न उपस्थित केला़ यात ७५ कामांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी ४८ कामांना वर्कआॅर्डर दिल्याचे आऱ के़ नाईक यांनी सांगितले़ मात्र, क्लर्क भोई यांना बोलावून सदस्यांनी रजिस्टरची तपासणी केली असता एकाही कामाला वर्कआॅर्डर दिली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याचे सांगण्यात आले़ नाईक हे भर सभागृहात खोटे बोलत असून आधीच त्यांच्या कार्यमुक्तीच्या ठरावाची अंमलबजावणी झाली असती तर ही वेळ आली नसती, अशा संतप्त प्रतिक्रिया सदस्यांनी व्यक्त केल्या़
विखरणचा तलाव २५ वर्षांपासून रखडला
जलयुक्तची कामे होऊनही विखरण चोरटकी या एकमेव गावाला एरंडोल तालुक्यात टँकर सुरू आहे़ येथील पाझर तलाव २५ वर्षांपासून दुरूस्तीसाठी केवळ दहा ते पंधरा लाखांसाठी अडकून पडला आहे, त्याच्याकडे लक्ष दिल्यास दहा गावांचा पाणीप्रश्न सुटेल. मात्र, याकडे लक्ष न देता नवीन कामांना मंजूरी देण्यात आल्याचे नानाभाऊ महाजन यांनी म्हटले आहे़
हायमास्टची कामे कशी?
जनसुविधा, नागरीसुविधा व तीर्थक्षेत्र विकास यात हायमास्टची कामे घेऊ नये, असे प्रशासनाचे पत्र असल्याने अन्य सदस्यांची कामे घेतली नाही, त्यामुळे रावेर, यावल, मुक्ताईनगर आदी ठिकाणची हायमास्टची कामे कशी, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर या ठिकाणची सुमारे एका कोटी वीस लाख रूपयांची कामे थांबविण्याचे आदेश उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी सभेत दिले़