आजोबांचा राजकीय वारसा चालवताय ईश्वरलाल जैन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:24 PM2018-12-16T12:24:44+5:302018-12-16T12:25:21+5:30
माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना समाजकारणाची परंपरा लाभली
चंद्रशेखर जोशी
माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना समाजकारणाची परंपरा लाभली ती त्यांचे आजोबा राजमल लखीचंद ललवाणी (जैन) यांच्याकडून. या संदर्भात माहिती देताना ईश्वरलाल जैन म्हणाले, आजोबा राजमल लखीचंद जैन यांना समाज कार्याची मोठी आवड होती. व्यवसाय करत असताना दीनदुबळ्यांना मदत करण्यात ते नेहमी पुढे असत. त्यांच्या समाज कार्याची दखलही त्याकाळी घेतली गेली. स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्टÑातील सात जिल्ह्यातून ते खासदार म्हणून लोकसभेत गेले होते. स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर होता. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यानंतर काही काळ आमदारही होते (जामनेर पूर्व खान्देश). जळगाव जिल्ह्यात फैजपूर येथे १९३६ मध्ये कॉँग्रेसचे पहिले ग्रामीण राष्टÑीय अधिवेशन झाले होते. या काळात त्यांच्यावर खजिनदारपदाची जबाबदारी होती. ईश्वरलाल जैन यांचे वडिल शंकरलाल हे राजकारणापासून अलिप्त होते. मात्र आजोबांचा राजकीय वारसा चालविला तो ईश्वरलाल जैन यांनी. त्यांचे वैशिष्टय म्हणजे १९७८ च्या कॉँग्रेसविरोधी लाटेतही ते जळगाव जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यावेळी ते कॉँग्रेसचे एकमेव आमदार होते. पुन्हा १९८० मध्ये ते जामनेर मतदार संघातून विधानसभेवर गेले. राज्याच्या अंदाजपत्रकीय समितीचे ते काही काळ अध्यक्ष होते. यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष, अनेक सामाजिक अन् सहकारी संस्थांचे आश्रयदाते असा त्यांचा लौकीक आहे. कॉँग्रेसमधून एक गट बाहेर पडून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्टÑवादी कॉँग्रेसची स्थापना झाली. यावेळी ईश्वलाल जैन हे पवार यांच्या बरोबरच राहीले. पक्षाचे कोषाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष अशा पदांवर त्यांनी काम केले. पक्षाबाबची निष्टा लक्षात घेऊन राष्टÑीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी जैन यांना राज्यसभेवर पाठविले. राज्यसभेचे सदस्य असताना त्यांच्याकडे संरक्षण, अर्थविषयक सल्लागार समिती तसेच वाणिज्यविषयक स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही त्यांच्यावर पक्षाने जबाबदारी सोपविली.
२०१० मध्ये ते जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधानपरिषदेवर निवडून आले. राजकीय जिवनात वडिलांच्या कार्याची छाप पडली असली तरी आपले राजकीय गुरू सुरेशदादा जैन असल्याचे ते सांगतात. विधान परिषदेत गेल्यावर शेतकरी व युवकांच्या विकासाचा प्रश्न त्यांनी हाती घेतला.
युवकांसाठी विविध मार्गदर्शन, प्रशिक्षण शिबिर आणि कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांच्या समस्या मनिष जैन यांनी जाणून घेतल्या. खान्देशात कापूस, केळी अमाप पिकते. पण त्यावर येथे प्रक्रिया उद्योग नाहीत. ही परिस्थिती बदलावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी भव्य अशी कापूस परिषद घेतली. या परिषदेत मुख्यमंत्र्यांनी खान्देशात कापूस संशोधन केंद्राची घोषणा केली होती.
वाढते कार्य लक्षात घेऊन मनिष जैन यांना राष्टÑवादी कॉँग्रेसकडून रावेर लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली. मात्र या निवडणुकीत त्यांना पराजयाला सामोरे जावे लागले. यानंतरच्या कालखंडात त्यांनी व्यवसायात लक्ष केंद्रीत केले आहे. ते म्हणतात पुन्हा राजकारणात येईल मात्र पण व्यवसायाला पूर्वीचे दिवस प्राप्त करून दिल्यानंतरच आणि ते दिवसही लवकर येतील असा त्यांना आत्मविश्वास आहे.
वारसा मनिष जैन यांच्याकडे
वडिलांच्या सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्याची छाप मनिष जैन यांच्यावर पडली. सुवर्ण व्यवसायात शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांचे पदार्पण झाले. मात्र तेथचे न थांबता नवे ज्ञान व तंत्रज्ञान आणि दागिण्यातील फॅशनचा बदलता ट्रेंड लक्षात घेत त्यांनी आधुनिकतेचा अंगिकार या व्यवसायात केला.