हिंगोणे येथे इसमाची विहिरीत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:12 AM2021-07-21T04:12:38+5:302021-07-21T04:12:38+5:30
हिंगोणा, ता. यावल : येथील रहिवासी कल्पेश रमेश भोळे (वय ४२) या अविवाहित इसमाने ग्रामपंचायतीच्या गाव ...
हिंगोणा, ता. यावल : येथील रहिवासी कल्पेश रमेश भोळे (वय ४२) या अविवाहित इसमाने ग्रामपंचायतीच्या गाव विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी पाच ते सहाच्या सुमारात ही घटना घडली.
विहिरीत उडी घेतल्याची बाब विठ्ठल मंदिर परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याच्या नातेवाईकांना सांगितले. त्यांच्या घरच्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला विहिरीतून काढण्यासाठी प्रयत्न केला. पण विहिरीचे पाणी ४० फुटांपर्यंत खोल होते. त्यामुळे मृतदेह सुरुवातीला सापडला नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी मारूळ येथील पाणबुड्याच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढला. नंतर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. तो मनोरुग्ण होता, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.
कपिल दिनकर खाचणे यांनी फैजपूर पोलिसांना माहिती दिली. तपास सपोनि प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बराटे, विनोद पाटील करीत आहेत.
हिंगोणा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
गावात पाणीपुरवठा करणाऱ्या चार ते पाच विहिरी आहेत. या विहिरींमध्ये अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे. यामुळे ग्रामपंचायतीने वारंवार ठराव करूनसुद्धा या विहिरींवर लोखंडी जाळी बसवण्यात येत नाही. परिणामी गावातील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेचे गांभीर्य ग्रामविकास अधिकारी देवानंद सोनवणे यांनी घेऊन तत्काळ त्या विहिरींवर लोखंडी जाळी बसविण्यात यावी, अशी मागणी गावातील संतप्त नागरिकांनी केली आहे.